गाडीचे हॉर्न वाजविले म्हणून वाहनचालकाला तीघांकडून मारहाण
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – गाडीचे हॉर्न वाजविल्याचा राग मनात धरून तिघांनी मिळून एकाच्या डोक्यात सेमेंटचे ब्लॉक मारून दुखापत केली. यात वाहनचालक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी तिघांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 4) रात्री अकराच्या सुमारास पिंपळे गुरव येथील शिवनेरी कॉलनी येथे घडला.
ऋषीकेश सरतापे, कुणाल सरतापे, रोहीत सरतापे (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संदीप दत्तात्रय देवकर (वय 27, रा. दत्तछाया सोसायटी, शिवनेरी कॉलनी, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास संदीप देवकर हे त्यांची गाडी पार्क करण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्या कॉलनीत राहणारा ऋषीकेश समोर आल्याने गाडीचे हॉर्न वाजवून बाजुला हो असे म्हणाले असता त्याने संदीप यांच्याशी शिवीगाळ केली. ‘तु काय इथला भाई आहे का’ असे म्हणून ऋषीकेशने त्याच्या दोन भावांना बोलावून संदीप यांना पुन्हा शिवीगाळ केली. सिमेंटचे गट्टु मारल्याने त्यांच्या डोक्यात जखम झाली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.