…तर हनुमानजी करतील भाजपाच्या लंकेचं दहन!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/raj-babbar-1.jpg)
गेल्या काही दिवसांपासून हनुमानाच्या जाती आणि धर्मावरून विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता काँग्रेस नेते आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. हनुमानाला दलित, वंचित म्हणून झालं. त्याला मुस्लिमही ठरवण्यात आलं. ज्यानंतर भाजपाला तीन राज्यांमध्ये सत्ता गमवावी लागली. या निवडणूक निकालांवरून धडा घेत भाजपाचे वाचाळवीर गप्प बसले नाहीतर तर मारुतीराया भाजपाच्या लंकेचे दहन करेल अशी टीका राज बब्बर यांनी केली आहे.
योगी आदित्यनाथ यांनी हनुमानाला आदिवासी, दलित म्हटले होते. त्यानंतर हा सगळा वाद सुरु झाला. काही महिन्यातच भाजपाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. हे कमी म्हणून की काय तर गेल्या शुक्रवारी भाजपाचे आमदार बुक्कल नवाब यांनी हनुमान मुस्लिम होता असे म्हटले होते. तर लक्ष्मी नारायण यांनी हनुमान जाट होता असे म्हटले होते. तर चेतन चौहान यांनी हनुमान खेळाडू होता असे म्हटले होते. या सगळ्या प्रकरणाचा तिखट शब्दात समाचार घेत राज बब्बर यांनी भाजपाला सुनावले आहे. हनुमानाची जात आणि धर्म काढणे थांबवा नाहीतर भाजपाची लंका तो जाळून काढेल असे राज बब्बर यांनी म्हटले आहे. लखनऊमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपावर टीका केली आहे.
एवढेच नाही तर राज बब्बर यांनी नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिकेचेही समर्थन केले आहे. बुलंदशहर हिंसाचारावरून नसीरुद्दीन शाह जे काही बोलले त्यात काय चूक आहे? ते एक जबाबदार अभिनेते आहेतच आणि एक जबाबदार पिताही आहेत. मग त्यांना जर मुलांबाबत चिंता वाटली तर त्यांना ती व्यक्त करण्याचा अधिकार नाही का? असाही प्रश्न राज बब्बर यांनी उपस्थित केला.