काही लोकांना सत्ता ऑक्सिजन समान, मोदींची काँग्रेसवर टीका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Arun-Jaitley-1-1.jpg)
दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९४ व्या जयंतीच्या एक दिवस आधी त्यांच्या स्मृतीनिमित्त १०० रूपयांचे नाणे जारी करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयींच्या कार्याचे कौतुक करताना काँग्रेसवरही टीका केली. काही लोकांना सत्ता ऑक्सिजनसारखी आहे. पण वाजपेयी आपल्या सार्वजनिक आयुष्यात दिर्घ काळ विरोधी पक्षात होते. तरीही त्यांनी नेहमी राष्ट्रहिताशी निगडीत विषयांवर आवाज उठवला, असे ते म्हणाले.
यावेळी वाजपेयींचे जुने सहकारी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, काही लोकांना सत्ता ऑक्सिजन समान आहे. ते त्याशिवाय जगू शकत नाहीत. तर दुसरीकडे वाजपेयी हे अनेक काळ विरोधी पक्षात राहूनही त्यांनी राष्ट्रहिताच्या मुद्यांवर आवाज उठवला. सिद्धांत आणि कार्यकर्त्यांच्या बळावर अटलजींनी इतकी मोठी राजकीय संघटना उभा केली. अटलजींचे बोलणे म्हणजे देशाने बोलणे आणि ऐकणे म्हणजे देशाने ऐकण्यासारखे होते. अटलजींनी लोभ आणि स्वार्थाशिवाय लोकशाहीला सर्वोच्च स्थानी ठेवले.
अटलजी आपल्यात नाहीत, हे मी आजही मानण्यास तयारी नाही. समाजातील सर्व वर्गावर प्रेम करणारे व्यक्ती होते. वक्ता म्हणून ते अद्वितीय होते. ते आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट वक्त्यांपैकी एक होते. त्यांचे जीवन येणाऱ्या पिढीला सार्वजनिक जीवनासाठी, व्यक्तीगत आयुष्यासाठी, राष्ट्र जीवनासाठी समर्पण भाव यासाठी नेहमी प्रेरणा देत राहील.