नरेंद्र मोदींचा पुणे दाैरा, पोलिसांच्या अनुउपस्थितीमुळे शवविच्छेदनास विलंब
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोच्या भूमिपूजनास आज (मंगळवारी) बालेवाडी स्टेडियमवर येणार आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यालयातील पोलिस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. यामुळे वायसीएम रुग्णालयातील चौकीत एकही पोलिस कर्मचारी उपस्थित न राहिल्याने सुमारे सहा ते सात तास शवविच्छेदन खोळंबून राहिला. यामुळे नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
कासारवाडी येथील रहिवासी असलेले बी. चौधरी (वय ४७) यांना उपचाराकरता गुजरातमध्ये नेण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. यामुळे अंत्यविधीसाठी त्यांचे पार्थिव कासारवाडी येथे रविवारी पहाटे आणण्यात आले.
शवविच्छेदन करण्यासाठी त्यांचे पार्थिव वायसीएम रुग्णालयात रविवारी सकाळी सात वाजता आणण्यात आले. मात्र मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी वायसीएम पोलिस चौकीत एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने नातेवाईक हतबल झाले. जवळपास साडेचार तास कोणताही पोलिस कर्मचारी वायसीएम चौकीत उपस्थित नसल्याने प्रतिष्ठित नागरिकांच्या मदतीने नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधला. मात्र पंतप्रधानांच्या बंदोबस्ताच्या रंगीत तालीमीमुळे कोणीच कर्मचारी नसल्याचे कारण पोलिसांनी सांगितले. यामुळे नातेवाईकांनी सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता साडेबारा वाजताच्या सुमारास त्यांनी पोलिस कर्मचाऱ्याला पाठवत असल्याचे सांगितले. त्यानंतर एक वाजताच्या सुमारास पोलीस कर्मचारी वायसीएममध्ये आले. शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी अडीच वाजताच्या सुमाराला चौधरी यांचे पार्थिव नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले.