माझ्या घरासह सगळ्यांनाच पाण्याचं नियोजन करावं लागणार-गिरीश बापट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/girish-bapat-1.jpg)
प्रत्येक पुणेकराने पाणी काटकसरीने आणि जपूनच वापरले पाहिजे असे सांगत असतानाच माझ्या घरासहीत सगळ्यांना पाण्याचे नियोजन करावं लागणार आहे असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यात पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. हे पाणी संकट मानवनिर्मित नाही तर निसर्ग निर्मित आहे अहे गिरीश बापट यांनी म्हटले आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुणे महानगरपालिका शहराची लोकसंख्या लक्षात घेता. १३५० एमएलडी पाण्याची गरज भासत होती. मात्र महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार आता पुणे शहराला ६५० एमएलडी पाणी मिळणार आहे. या आदेशामुळे पुण्यात पाणी प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. यावर विविध संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असून आज स्मार्ट सिटी योजनेची बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर पालकमंत्री गिरीश बापट यांना पाणी प्रश्नावर प्रश्न विचारला असता. ते म्हणाले की, यंदा पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्या चार धरणात २० टक्के पाऊस कमी झाला आहे.
त्यामुळे या पूर्वीच जलसंपदा आणि महापालिका प्रशासना मार्फत पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर आता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमनाच्या आदेशानुसार आता माझ्या घरासह पाण्याचे नियोजन करावे लागणार असून पाणी प्रश्नावर कोणी ही राजकारण करू नये. असा सल्ला देखील त्यांनी विरोधकांना दिला.ते पुढे म्हणाले की, जुलै महिन्यापर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात येत असून पाणी प्रश्न गंभीर असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले.