‘माऊली’चे आशीर्वाद, रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/ritesih-759.jpg)
‘लय भारी’ या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनिलिया एकत्र येत ‘माऊली’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. त्यामुळे सध्या रितेश माऊलीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभरात रितेशची लोकप्रियता किती अफाट प्रमाणात आहे याचा प्रत्यय आला आहे.
‘स्कोर ट्रेंड्स इंडिया’च्या लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत रितेश टॉप १० मध्ये आला आहे. ‘माऊली’च्या प्रमोशनच्या सुरूवातीला स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर रितेश १७ व्या स्थानावर होता. मात्र चित्रपटाचं प्रमोशन सुरु झाल्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत वाढ होत तो थेट ९ व्या स्थानावर पोहोचला. अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे.
‘ देशभरामध्ये मराठी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये रितेशची मोठ्या प्रमाणावर क्रेझ आहे. याच कारणामुळे रितेशची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. त्यातच त्याचा आगामी ‘माऊली’ हा चित्रपट देखील प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रमोशनमुळे सोशल, वायरल आणि डिजिटल प्लेटफार्मवर रितेशची लोकप्रियता किती आहे हे दिसून आलं आहे’, असं स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल यांनी सांगितलं.
पुढे त्या असंही म्हणाल्या, ‘आम्ही १४ भारतीय भाषांमधील ६०० हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे’.
दरम्यान, १४ डिसेंबरला रितेशचा हा चित्रपट प्रदर्शित होणात असून, आदित्य सरपोतदारने त्याच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘मुंबई फिल्म कंपनी’ आणि ‘हिंदुस्तान टॉकीज’च्या निर्मितीअंतर्गत साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अजय- अतुल या जोडीने घेतली आहे.