एमआयएमच्या अकबरुद्दीन आेवैसीपुढे शिवसेना,भाजपा-काँग्रेस उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
हैदराबाद – एमआयएमच्या अकबरुद्दीन ओवैसी यांच्यापुढे काँग्रेस, भाजपा अन् शिवसेना नेत्यांचा दारुण पराभव झाला आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत चंद्रयानगुट्टा मतदारसंघातून ओवैसी यांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे ओवैसी यांच्याविरोधात लढणाऱ्या शिवसेना उमेदवाराला केवळ 112 मतं मिळाली आहेत. त्यामुळे औवेसींविरुद्ध लढणाऱ्या सर्वच 14 विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
विजयी उमेदवारास मिळालेल्या मतदानाच्या 1/3 (एक तृतिअंश) मतदान मिळवणे विरोधी उमेदवारास आवश्यक आहे. अन्यथा, त्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते. निवडणूक आयोगाच्या या नियमानुसार चारही दिग्गज पक्षांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. विशेष म्हणजे, शिवसेना उमेदवार सुदर्शन मलकान यांना केवळ 112 मते मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेनेनं या मतदारसंघात उमेदवार देत आपले हसू करुन घेतले, असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही. दरम्यान, ओवैसींविरुद्ध अक्कीनामोनी व्यंकटेश या अपक्ष उमेदवाराला सर्वात कमी म्हणजे 60 मतं मिळाली आहेत. दरम्यान, ही आकडेवारी दुपारी 12.46 पर्यंतची आहे.