सर्जिकल स्ट्राइकवरुन राजकारण करु नका! निवृत्त लेफ्टनंट जनरलने सुनावले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/hooda-army.jpg)
सर्जिकल स्ट्राइकवरुन अतिशयोक्ति करुन काही उपयोग होणार नाही. लष्करी मोहिमांवरुन अशा प्रकारे राजकारण करणे योग्य नाही असे मत निवृत्त लेफ्टनंट जनरल डी.एस.हुड्डा यांनी व्यक्त केले. उरी दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने सप्टेंबर २०१६ मध्ये पीओकेमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. त्यावेळी डी.एस.हुड्डा उत्तरी सैन्य विभागाचे कमांडर होते.
सैन्य साहित्य महोत्सवात ते सीमा पार मोहिमा आणि सर्जिकल स्ट्राइक या विषयावर बोलत होते. सर्जिकल स्ट्राइकनंतर या मुद्यावरुन राजकारण झाल्याचे आरोप झाले. ठराविक व्हिडिओ, फोटो लीक करुन या लष्करी मोहिमेला राजकीय रंग दिला गेला असे हुड्डा म्हणाले. सर्जिकल स्ट्राइकच्या अतिशयोक्तिचा फायदा होईल का ? माझे उत्तर नाही असेल. लष्करी मोहिमांना राजकीय रंग देणे चांगले नाही असे हुड्डा म्हणाले.
ठराविक फोटो, व्हिडिओ लीक करुन या पूर्णपणे लष्करी असलेल्या मोहिमेला राजकीय रंग दिला गेला असे हुड्डा म्हणाले. भविष्यातील ऑपरेशन्सचा निर्णय घेणाऱ्यांच्या विचार क्षमतेवर या स्ट्राइकचा कितपत परिणाम होईल या प्रश्नावर तुम्ही मोहिम यशस्वी झाल्याची अतिशोयक्ती केली तर यशाच सुद्धा ओझं बनतं असं उत्तर हुड्डा यांनी दिलं.
सर्जिकल स्ट्राइकची योजना आखताना पाकिस्तान उरी सारखे दहशतवादी हल्ले बंद करेल असा विचार आमच्या मनात नव्हता. २०१३ पासून सीमेपलीकडून येणाऱ्या दहशतवाद्यांनी सांबा, हीरानगर, पठाणकोट आणि उरी येथील लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. बुरहान वानीच्या मृत्यूमुळे जुलै २०१६ पासून लष्करावर दबाव होता.
सर्जिकल स्ट्राइकमुळे पाकिस्तानच्या बाजूला गोंधळ, घबराट निर्माण झाली होती. त्यांच्या सुट्टया रद्द झाल्या. आम्ही त्यांचे रेडिओ संदेश पकडले. आम्ही आणखी काही भागांमध्ये अशी कारवाई करु शकतो असे त्यावेळी पाकिस्तानी लष्कराला वाटत होते. आम्ही इतक्या आतमध्ये येऊन हे ऑपरेशन कसे केले हा प्रश्न पाकिस्तानला पडला होता. त्यांना धक्का बसला होता असे हुड्डा यांनी सांगितले.