ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संविधानाचा सन्मान अन् शहीदांच्या बलिदानाचे स्मरण!

डीएसके कुंजबनच्या शौर्यस्थळावर संविधान दिन उत्साहात साजरा

– माजी सैनिक आणि ज्येष्ठ नागरिकांकडून संविधान मूल्यांचा जागर

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

भारतीय संविधानाने दिलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा जागर करत, देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांच्या बलिदानाचे स्मरण करीत काटे चौकातील डीएसके कुंजबन सोसायटीच्या शौर्यस्थळावर भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधानाचा आदर, राष्ट्राची एकता, अखंडता आणि लोकशाही मूल्ये जपण्याचा संदेश देण्यात आला.

संत गगनगिरी महाराज शाखा आणि ओम गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) सकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डीएसके कुंजबन गृहरचना सोसायटीचे चेअरमन अधिकराव दिवे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंजवडी गटाचे सेवा समिती प्रमुख सुमित जावडेकर आणि भारतीय माजी सैनिक संघाच्या मावळ-मुळशी तालुक्याचे अध्यक्ष तथा कारगिल समरसेनानी रामदास मदने यांची प्रमुख उपस्थिती होती.

अमर जवान ज्योत प्रज्वलित करून वीरांना अभिवादन

कार्यक्रमाच्या प्रारंभी अमर जवान ज्योत प्रज्वलित करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्मे तसेच २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले सुरक्षा दलांचे जवान, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अमर जवान स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी प्रमुख वक्ते आणि उपस्थित मान्यवरांनी भारतीय संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये, लोकशाही व्यवस्थेचे संरक्षण तसेच संविधानातील मूल्यांचा दैनंदिन जीवनात अंगीकार करण्याची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन केले. संविधानाचा केवळ सन्मान करणे पुरेसे नसून त्यातील मूल्यांनुसार आचरण करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असल्याचे मान्यवरांनी अधोरेखित केले.

हेही वाचा –  शिवाजीनगर न्यायालयाबाहेरील हल्ला प्रकरणातील आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी

संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

कार्यक्रमादरम्यान भारतीय संविधान आणि संविधानाच्या उद्देशिकेचे पूजन करण्यात आले. राजेश कठाळे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. त्यांच्यासमवेत उपस्थित नागरिकांनी सामूहिक वाचन करून संविधानाप्रती आपली निष्ठा व्यक्त केली.

या कार्यक्रमाला भारतीय माजी सैनिक संघाच्या मावळ-मुळशी तालुक्याचे उपाध्यक्ष लेफ्टनंट अमर सिंग, मानद सचिव नायब सुभेदार राजेंद्र कत्ते, कार्यकारिणी सदस्य हवालदार महादेव बिरादर, सार्जंट करंकाळ यांच्यासह डीएसके कुंजबन, यशवंत इन्फिनिटी, पुणे विले, साईग्रेस सोसायटी आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक व देशप्रेमी नागरिक उपस्थित होते.

ओम गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रत्नाकर करंकाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीतानंतर ‘जय जवान, जय किसान’, ‘जय संविधान’, ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“भारतीय संविधान आपल्याला न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा मार्ग दाखवते. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीदांचे बलिदान आपल्याला देशनिष्ठा, कर्तव्य आणि राष्ट्राप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देते. संविधानाचा आदर करणे आणि देशाची एकता, अखंडता व शांतता जपणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. शहीदांच्या बलिदानाचे स्मरण आणि संविधानातील मूल्यांचे पालन हीच राष्ट्राप्रती खरी कृतज्ञता ठरेल.”

– कारगिल समरसेनानी रामदास मदने, अध्यक्ष, भारतीय माजी सैनिक संघ, मावळ-मुळशी तालुका.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group