शिवाजीनगर न्यायालयाबाहेरील हल्ला प्रकरणातील आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी
मंदार किवळेवरील हल्ल्याचा कट, शस्त्रे आणि वाहनांबाबत तपास; पोलिसांनी मागितली होती दहा दिवसांची कोठडी

पुणे : शिवाजीनगर येथील सत्र न्यायालय परिसरात मंदार किवळे याच्यावर झालेल्या गोळीबार आणि हल्ला प्रकरणातील सहा आरोपींना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी (२५ नोव्हेंबर) घडलेल्या या घटनेनंतर पुणे पोलिसांनी आरोपींना अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले. अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एस. डी. पंजवानी यांच्यासमोर सुनावणी झाली.
या प्रकरणात आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करताना सरकारी पक्षाने हल्ल्यासाठी वापरलेली शस्त्रे कुठून आणली, याचा तपास करायचा असल्याचे सांगितले. तसेच, वाहनांची जप्ती, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलमधील पुराव्यांच्या आधारे पुढील तपास करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. त्यासाठी दहा दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने सहा दिवसांची कोठडी मंजूर केली.
आरोपींच्या वकिलांचा वेगळा युक्तिवाद
सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी, केवळ एकाच ठिकाणी राहतात म्हणून सर्वांना या प्रकरणात आरोपी करण्यात आल्याचा युक्तिवाद केला. दुसरीकडे, सरकारी वकिलांनी आरोपींनी हत्येचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला. हल्ल्यात वापरलेली वाहने पोलिसांनी जप्त केली असून, सीसीटीव्ही आणि मोबाईलमधील फुटेजही तपासासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा – शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर, काळजीचे कारण नाही
जुन्या हत्येच्या वादातून हल्ला झाल्याचा संशय
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, २०२५ मध्ये पुण्यातील कात्रज परिसरात जमिनीच्या वादातून शुभम चव्हाण याची हत्या झाली होती. त्या प्रकरणात मंदार किवळे आरोपी होता. त्याला दोन दिवसांपूर्वीच जामीन मिळाला होता. या जुन्या प्रकरणाचा बदला घेण्यासाठी किवळेवर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
शुभमचा भाऊ अक्षय चव्हाण याने या हल्ल्याचा कट रचल्याचा आणि त्यासाठी अन्य तरुणांना सहभागी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. जामिनावर बाहेर आलेल्या किवळेवर पाळत ठेवून हल्ला करण्यात आल्याच्या दिशेनेही तपास सुरू आहे. या प्रकरणातील कट, आरोपींची भूमिका आणि हल्ल्यासाठी वापरलेल्या शस्त्रांची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.




