रावेतमध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प होऊ देणार नाही : अण्णासाहेब बनसोडे
निगडी प्राधिकरणातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने घेतली विधानसभा उपाध्यक्षांची भेट

– एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही चर्चा
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
रावेत येथे प्रस्तावित असलेल्या कचऱ्यापासून वीजनिर्मितीच्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. निगडी प्राधिकरणातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची भेट घेऊन प्रस्तावित जागेवर हा प्रकल्प उभारू नये, अशी विनंती केली. शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर रावेतमधील प्रस्तावित ठिकाणी हा प्रकल्प होऊ दिला जाणार नाही, अशी ठाम भूमिका बनसोडे यांनी मांडली.
शिष्टमंडळात आर. एस. कुमार, निलेश शिंदे, ॲड. दलाल दाम्पत्य, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जोशीसाहेब, संतोष सायकर आणि रविंद्र हिंगे यांचा समावेश होता. रावेतमधील प्रस्तावित जागेबाबत स्थानिकांचा विरोध त्यांनी बनसोडे यांच्यासमोर मांडला. या विषयावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही सविस्तर चर्चा झाली आहे.
हेही वाचा – ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी जरांगेंचा गंभीर आरोप; एसआयटीला क्लिप दिली, सोर्स देण्यास नकार
महापालिकेने मागितली एमआयडीसीची २५ एकर जागा
पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी रावेत परिसरातील एमआयडीसीची सुमारे २५ एकर जागा मागितली आहे. प्रस्तावित प्रकल्पात दररोज सुमारे एक हजार टन सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे मोशी कचरा डेपोवरील ताण कमी होईल, अशी महापालिका प्रशासनाची भूमिका आहे.
लोकवस्तीच्या जवळ प्रकल्प उभारण्यास आक्षेप
प्रस्तावित जागेजवळ दाट लोकवस्ती असून, जलशुद्धीकरण केंद्र आणि दुर्गादेवी टेकडीचा परिसरही जवळ आहे. त्यामुळे संभाव्य प्रदूषण, सार्वजनिक आरोग्य आणि परिसरातील हरित क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांबाबत नागरिकांनी यापूर्वीही चिंता व्यक्त केली आहे. स्थानिक नगरसेवकांनीही प्रस्तावित प्रकल्पासाठी लोकवस्तीपासून सुरक्षित अंतरावरील पर्यायी जागेचा विचार करावा, अशी मागणी केली आहे.




