Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये; १५ लाख विद्यार्थ्यांना शुल्कमाफी

दुष्काळग्रस्त ३१० तालुक्यांतील विद्यार्थ्यांना ९६.२७ कोटींची सवलत; कॉपीमुक्त परीक्षेसाठी सीसीटीव्ही, भरारी पथके आणि ड्रोनद्वारे निगराणी

मुंबई : फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नियोजन काटेकोरपणे करण्याचे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी मंत्रालयातील आढावा बैठकीत सांगितले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२७ या कालावधीत घेण्याचे नियोजन केले आहे. दोन्ही परीक्षांचे निकाल एप्रिलअखेर जाहीर करण्याचे उद्दिष्ट आहे. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी, तर दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान होतील.

१५ लाख विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी

राज्यातील दुष्काळग्रस्त घोषित ३१० तालुक्यांतील दहावी आणि बारावीच्या १५ लाख २८ हजार ६२७ विद्यार्थ्यांना अंदाजे ९६ कोटी २७ लाख रुपयांची परीक्षा शुल्कमाफी देण्यात येणार आहे. यामध्ये दहावीचे ८ लाख ५२ हजार ४९६ आणि बारावीचे ६ लाख ७६ हजार १३१ विद्यार्थी आहेत. यापूर्वी शुल्क भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांना परतावा देण्याची प्रक्रियाही सुरू आहे. नियमित शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२६ आहे.

हेही वाचा –  उजनी धरण परिसरात तीन ठिकाणी आधुनिक मत्स्यबाजार उभारणार

कॉपीमुक्त परीक्षेसाठी कडक व्यवस्था

बारावीची ३ हजार ३३२ आणि दहावीची ४ हजार ९९७ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र परिरक्षक केंद्रे, चोवीस तास पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्हीची व्यवस्था असेल.

जानेवारी २०२७ मध्ये शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कॉपीमुक्त अभियानासाठी जनजागृती सप्ताह राबविण्यात येणार आहे. संवेदनशील केंद्रांवर भरारी पथके, बैठी पथके आणि आवश्यकतेनुसार ड्रोनद्वारे निगराणी ठेवली जाईल. परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्रे परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची सुविधा

विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी मंडळाचे १० आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे ३०० समुपदेशक उपलब्ध राहणार आहेत. तसेच ‘टेली मानस’ हेल्पलाइन १४४१६ आणि ‘मनोदर्पण’ हेल्पलाइन ८४४८४४०६३२ द्वारे मार्गदर्शन मिळणार आहे. प्रश्नपत्रिकांचे डिजिटल वितरण, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग आणि डिजिटल मूल्यमापन प्रक्रियेलाही प्राधान्य दिले जाणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group