पुणेकरांच्या सुरक्षिततेशी तडजोड नाही; गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणार : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
शिवाजीनगर न्यायालयाबाहेरील गोळीबार आणि हल्ल्याची गंभीर दखल; आरोपींचा शोध घेण्याचे पोलिसांना निर्देश

पुणे : शिवाजीनगर न्यायालय परिसरात जामिनावर बाहेर आलेल्या मंदार किवळे याच्यावर गोळीबार करून कोयत्याने हल्ला केल्याच्या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. या घटनेची राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी गंभीर दखल घेतली असून, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा ठाम इशारा त्यांनी दिला आहे.
शिवाजीनगर न्यायालयाबाहेर घडलेली गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करण्याची घटना अत्यंत दुर्दैवी व गंभीर असल्याचे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू असून, दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेने अधिक सतर्क आणि कठोर राहावे, अशा सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करणे, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष ठेवणे आणि गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवणे यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – कोयनेचे पाणी मुंबईला आणण्याची जुनी योजना; वीज निर्मितीनंतर समुद्रात जाणारे पाणी वापरणार : मंत्री गिरीश महाजन
आरोपींवर कठोर कारवाईचे संकेत
न्यायालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणाबाहेर घडलेली ही घटना शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर मानली जात आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असून, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणेने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे.




