मशीनकडे थोडी ‘बुद्धी’ असेल, पण माणसाकडे संपूर्ण ‘मन’ आहे!
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात माणुसकी, संवेदना आणि मानवी अस्तित्वाचा प्रश्न

विशेष लेख : अविनाश आदक
आजचे जग तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI ने मानवी जीवनात मोठी क्रांती घडवून आणली आहे. ChatGPT सारखी माध्यमे आज काही सेकंदांत लेख लिहू शकतात, विचार मांडू शकतात, माहितीचे विश्लेषण करू शकतात आणि माणसाच्या कल्पनांना शब्दरूप देऊ शकतात. ही निश्चितच आधुनिक विज्ञानाची मोठी उपलब्धी आहे. मात्र, या प्रगतीच्या झगमगाटात आपण एक महत्त्वाचा प्रश्न विसरत आहोत.. तंत्रज्ञान माणसासाठी निर्माण झाले आहे की माणूस तंत्रज्ञानासाठी जगू लागला आहे?
ChatGPT सारखी कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही प्रगत झाली, तरी ती शेवटी एक निर्जीव माध्यम आहे. तिच्याकडे माहिती आहे, पण अनुभव नाही. शब्द आहेत, पण भावना नाहीत. ती प्रेमावर सुंदर लिहू शकते, पण प्रेमाचा स्पर्श अनुभवू शकत नाही. दुःखाचे वर्णन करू शकते, पण स्वतःच्या डोळ्यांतून अश्रू ढाळू शकत नाही. आनंद, वेदना, राग, भीती, आशा, निराशा, करुणा, अभिमान, विश्वास आणि तळमळ या मानवी भावनांचे स्वरूप तिला माहितीच्या आधारे समजते; मात्र जिवंत माणसाप्रमाणे त्या भावनांचा व्यक्तिगत अनुभव तिला येत नाही.
माणसाचे खरे सामर्थ्य केवळ त्याच्या बुद्धिमत्तेत नाही, तर त्याच्या संवेदनशीलतेत आहे. दुसऱ्याच्या दुःखाने व्याकूळ होणारे मन, संकटात मदतीसाठी पुढे येणारे हात, नात्यांमध्ये जपली जाणारी आपुलकी आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य या गोष्टी कोणत्याही मशीनच्या कार्यक्षमतेपेक्षा मोठ्या आहेत.
आज मात्र परिस्थिती काहीशी उलटी होताना दिसत आहे. मशीन माणसाला मदत करण्याऐवजी माणूसच मशीनच्या सूचनांवर चालू लागला आहे. विचार करण्यासाठी मशीन, निर्णय घेण्यासाठी मशीन, संवादासाठी मशीन आणि अगदी भावना व्यक्त करण्यासाठीही मशीन! तंत्रज्ञानाचा वापर करणे चुकीचे नाही; परंतु त्याच्यावर इतके अवलंबून राहणे की स्वतःची विचारशक्ती, निर्णयक्षमता आणि मानवी संवेदना हरवून बसणे, हे निश्चितच घातक आहे.
मशीनने माणसाचे काम सोपे करावे, माणसाचे अस्तित्व नियंत्रित करू नये. मशीनने माणसाला दिशा द्यावी, पण माणसाच्या आयुष्याचा सूत्रधार बनू नये.
या विश्वाचा खरा सूत्रधार जिवंत माणूसच असायला हवा. कारण मशीन निर्माण करणारा माणूस आहे, त्याला दिशा देणारा माणूस आहे आणि त्याच्या उपयोगाची मर्यादा ठरवणारा देखील माणूसच असायला हवा. तंत्रज्ञानाने माणसाच्या हातातील साधन राहावे; माणसाच्या मनावर आणि निर्णयांवर अधिराज्य गाजवणारी शक्ती बनू नये.
शेवटी, मशीनकडे बुद्धी असू शकते, पण माणसाकडे मन आहे. मशीन माहिती देऊ शकते, पण माणूस जीवनाला अर्थ देतो. म्हणूनच तंत्रज्ञानाच्या युगात एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे.
मशीनचा वापर करा, पण मशीन बनू नका. तंत्रज्ञान स्वीकारा, पण माणुसकी विसरू नका. कारण या विश्वाचा खरा निर्माता, विचारकर्ता आणि सूत्रधार जिवंत माणूसच आहे.. मशीन नव्हे!




