TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोकुळ दूध उत्पादकांना दिलासा! म्हशीच्या दूध खरेदी दरात ३ रुपयांची वाढ; विक्री दरही ६ रुपयांनी महागणार

नवनियुक्त चेअरमन शिवाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखालील पहिल्याच बैठकीत महत्त्वाचा निर्णय; गायीच्या दूध खरेदी-विक्री दरात प्रत्येकी २ रुपयांची वाढ

कोल्हापूर : राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) नव्या संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत दूध दरवाढीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर ६ रुपयांची, तर खरेदी दरात ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर तीन रुपये अधिक मिळणार आहेत. तसेच गायीच्या दूध खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

गोकुळ दूध संघाचे नवनियुक्त चेअरमन माजी आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दूध संघाला असलेली सुमारे ७० कोटी रुपयांची तूट भरून काढण्याच्या दृष्टीने विक्री दरात वाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ही गोकुळच्या इतिहासातील मोठ्या दरवाढींपैकी एक असल्याची चर्चा आहे. नव्या दरांची अंमलबजावणी शनिवारपासून होणार असल्याचे वृत्त आहे. जानेवारी महिन्यात दूध उपलब्धतेचा आढावा घेऊन पुन्हा दरवाढीचा विचार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

समविचारी आघाडीकडून खरेदी दरवाढीची मागणी

दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुधासाठी अधिक दर मिळावा, अशी मागणी समविचारी आघाडीकडून करण्यात येत होती. अमूलसह देशातील अनेक दूध संस्थांनी विक्री दरात वाढ केल्यानंतर गोकुळकडूनही दरवाढीचा विचार सुरू होता.

दूध विक्री दरात वाढ करण्यास विरोध नसला, तरी आधी दूध खरेदी दर वाढवावा, अशी भूमिका समविचारी आघाडीने मांडली होती. अखेर संचालक मंडळाच्या बैठकीत खरेदी आणि विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा –  अजित पवार अपघात प्रकरणात रोहित पवारांचा नवा दावा; VSR कंपनीच्या मालकाने पाच विमाने अमेरिकेत हस्तांतरित केल्याचा आरोप

गोकुळच्या चेअरमन निवडीवरून राजकीय वाद

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या पॅनेलने १३ जागा जिंकत बहुमत मिळवले होते. तर महायुतीच्या पॅनेलला १२ जागा मिळाल्या होत्या. मात्र, संचालक मंडळातील आवश्यक १४ सदस्यांचा कोरम पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने चार शासननियुक्त सदस्यांची नियुक्ती केली आणि त्यांना मतदानाचा अधिकारही दिला.

या निर्णयामुळे महायुतीच्या नेतृत्वाखालील गटाला चेअरमनपदाच्या निवडणुकीत संधी मिळाली आणि माजी आमदार शिवाजी पाटील यांची चेअरमनपदी निवड झाली. या निवडीवरून राजकीय वातावरण तापले होते. आता नव्या संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत झालेल्या दूध दरवाढीच्या निर्णयाकडे दूध उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group