नागपुरात भरधाव कार पुलाचे कठडे तोडून नाल्यात कोसळली; एकाचा मृत्यू
अंबाझरी ओव्हरफ्लो पॉईंटजवळ पहाटे चारच्या सुमारास अपघात; भंडाऱ्यात पोलिस चौकीजवळच किराणा दुकान फोडून चोरी

नागपूर : नागपूर शहरातील अंबाझरी तलावाच्या ओव्हरफ्लो पॉईंटजवळ पहाटेच्या सुमारास भीषण कार अपघात झाला. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने पुलाचे कठडे तोडले आणि थेट अंबाझरी नाल्यात कोसळली. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती अंबाझरी पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाझरी ते सुभाषनगर मार्गावर पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील कारवाई सुरू केली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर अपघातामागील कारण समोर येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – संत्री खाण्याचे अनेक फायदे, पण ‘या’ लोकांनी सेवन करताना घ्यावी काळजी
भंडारा शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे. ज्वेलर्स दुकान, किराणा दुकान आणि घरफोडीच्या घटनांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच खात रोड परिसरात नागरिक आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी पोलिस चौकी सुरू करण्यात आली होती. मात्र, याच परिसरातील देव्हारे किराणा दुकानाचे शटर तोडून चोरी करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून साहित्याची उलथापालथ केली आणि ऐवज लंपास केला. चोरीला गेलेली रोकड आणि साहित्याची नेमकी किंमत अद्याप स्पष्ट झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.




