TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शायना एनसी यांची अखेर माफी; बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राच्या वादावर सोशल मीडियातून स्पष्टीकरण

पत्रकार परिषदेत अनावधानाने छायाचित्र फाडल्याची कबुली; ‘बाळासाहेबांवरील प्रेम आणि निष्ठा सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राची गरज नाही’, शायना एनसी यांची ठाम भूमिका

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राच्या वादावरून टीकेला सामोरे जावे लागलेल्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचा निषेध करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अनावधानाने बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडले गेल्याने वाद निर्माण झाला होता. यानंतर शायना एनसी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आणि या कृतीमुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागितली.

बुधवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत हा प्रकार घडला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शायना एनसी यांना भेटीसाठी बोलावल्याचे वृत्त समोर आले होते. आता शायना एनसी यांनी स्वतः सोशल मीडियावर भूमिका मांडत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, त्यांच्या माफीनंतरही ठाकरे गटाने आंदोलनाची हाक दिल्याने वाद निवळणार की आणखी वाढणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

‘बाळासाहेब माझ्यासाठी पितृतुल्य आणि देवतुल्य व्यक्तिमत्त्व’

शायना एनसी यांनी आपल्या पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या कौटुंबिक आणि वैयक्तिक आठवणींना उजाळा दिला. त्या लहान असताना बाळासाहेबांची भेट झाल्याचे आणि ते आपल्या वडिलांचे जवळचे मित्र असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या कुटुंबाशी बाळासाहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. आपल्या लग्नासारख्या महत्त्वाच्या प्रसंगीही बाळासाहेब उपस्थित होते, असे त्यांनी नमूद केले.

बाळासाहेब हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशातील अद्वितीय नेतृत्व होते. त्यांचे विचार, स्पष्ट भूमिका आणि निर्भीडपणा आपल्याला नेहमी प्रेरणा देत असल्याचेही शायना एनसी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा –  UPI शुल्काबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? २०२७ पर्यंत MDR शुल्काचा प्रस्ताव लांबणीवर पडण्याची शक्यता

‘माझा हेतू बाळासाहेबांचा अनादर करण्याचा नव्हता’

पत्रकार परिषदेत बाळासाहेबांच्या विचारांचा संदर्भ दिला होता. मात्र, आपल्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आल्याचा दावा शायना एनसी यांनी केला. बाळासाहेबांचा अनादर करण्याचा आपला हेतू कधीच नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.

या कृतीमुळे खऱ्या शिवसैनिकांच्या किंवा बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मनापासून माफी मागते, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याचवेळी बाळासाहेबांवरील आपले प्रेम आणि निष्ठा सिद्ध करण्यासाठी कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

ठाकरे गटाच्या आंदोलनाकडे लक्ष

शायना एनसी यांच्या माफीनंतरही हा वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. ठाकरे गटाने मुंबईत त्यांच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे शायना एनसी यांनी माफी मागितल्यानंतर ठाकरे गट आंदोलनाचा निर्णय कायम ठेवणार की माघार घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, शायना एनसी यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करत ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ असा संदेश दिला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group