“आम्ही निवडणुकांवर बहिष्कार घालणार नाही”; शिकागो विद्यापीठातील संवादात राहुल गांधींचे मोठे विधान

नवी दिल्ली | लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, त्यांनी शिकागो येथील विद्यापीठात विद्यार्थ्यांसोबत एका विशेष संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला. या दौऱ्यात त्यांनी लहानपणी त्यांना गणित शिकवणाऱ्या शिक्षकांचीही भेट घेतली. दरम्यान, शिकागो विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, विरोधी पक्ष निवडणुकांवर बहिष्कार घालणार नाही.
संवादाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, “प्रत्येकाला आपल्या दृष्टिकोनातून विचार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. मला लहानपणी हे शिकवले गेले आहे की आपण कायम जिज्ञासू वृत्ती ठेवली पाहिजे आणि या वृत्तीवर कोणतीही सीमारेषा असता कामा नये. त्यामुळे तुम्ही मला राजकारण, महिलांचे प्रश्न किंवा इतर कोणत्याही मुद्द्यावर बिनधास्त प्रश्न विचारा.”
हेही वाचा
बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा भडका; बॉम्बस्फोट आणि जाळपोळीच्या घटनांनी तणाव वाढला
या संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांना “तुम्ही आगामी निवडणुका लढवणार की त्यावर बहिष्कार घालणार?” असा प्रश्न विचारला असता, यावर आपली सविस्तर भूमिका मांडताना राहुल गांधी म्हणाले की, “आमच्यासाठी भारतीय लोकशाही पवित्र असून जोपर्यंत माझ्याकडे १०० टक्के पुरावा नसेल, तोपर्यंत भारतीय लोकशाहीत काही समस्या आहे असे म्हणणेही माझ्यासाठी कठीण आहे; जर आम्ही निवडणुकीत सहभागी होणार नाही असे म्हटले तर त्याच क्षणी भारतीय लोकशाहीचा अंत होईल आणि आम्हाला भारतीय लोकशाहीची चौकट मोडीत काढायची नाही, कारण विरोधी पक्षाने निवडणूक न लढवण्याची घोषणा केली तर भारतीय जनतेच्या नजरेत संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच अवैध ठरेल, त्यामुळे आम्ही निवडणुकांवर बहिष्कार घालणार नाही.”
निवडणूक प्रक्रियेवरील रणनीती आणि आयोगाबाबत दावा
आपली पुढील रणनीती स्पष्ट करताना राहुल गांधी यांनी पुढे नमूद केले की, “जे काही घडत आहे ते सर्व जनतेसमोर आणावे आणि जोपर्यंत भारतीय जनतेला हे उमजत नाही की संपूर्ण व्यवस्था नष्ट झाली आहे, तोपर्यंत लोकांमध्ये यावर चर्चा सुरू ठेवावी, अशी आमची रणनीती आहे.” तसेच, “आम्हाला खुद्द निवडणूक आयोगाच्या आतूनच माहिती मिळत असून, आता ही संपूर्ण व्यवस्था कोसळायला केवळ काही काळच उरला आहे,” असा दावाही राहुल गांधी यांनी या संवादादरम्यान केला आहे.




