महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवर विशेष नियोजन; दादर स्थानकाच्या नामकरणाची प्रक्रिया अधिवेशनात पूर्ण होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अनुयायांसाठी सुरक्षा, वाहतूक, आरोग्य व स्वच्छतेच्या सुविधांवर भर, इंदू मिल स्मारकासाठी वाढीव निधी देण्याची ग्वाही

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी आवश्यक सुविधा, सुरक्षा, वाहतूक, आरोग्य आणि स्वच्छतेच्या व्यवस्थांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्यास राज्य शासनाने तत्त्वतः मान्यता दिली असून, केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक प्रक्रिया विधिमंडळाच्या अधिवेशनात पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृह राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री संजय बनसोडे, समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, भाई गिरकर यांच्यासह विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी, रेल्वे आणि मुंबई महापालिकेचे अधिकारी तसेच विविध बौद्ध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे
महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यासह देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येतात. दरवर्षी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन उपलब्ध सुविधांमध्ये सुधारणा करावी आणि मागील वर्षांच्या अनुभवातून समोर आलेल्या त्रुटी दूर कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. मुंबई महापालिका, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि अन्य संबंधित विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
अनुयायांना कोणताही त्रास होऊ नये आणि अनुचित घटना घडू नये, यासाठी चैत्यभूमी परिसरात धरणे, निदर्शने, मोर्चे किंवा आंदोलनांवर अधिकृत बंदी जाहीर करण्याबाबत गृह विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. परिसरात शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि श्रद्धापूर्ण वातावरण राखण्यासाठी पोलीस व प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.
वाहतूक व्यवस्थेत ऑटोरिक्षांच्या प्रवेशावर मर्यादा, अनुयायांच्या पुढील प्रवासासाठी सुविधा आणि परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याबाबत पूर्वनियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रेल्वे, रस्ते वाहतूक, स्थानिक वाहतूक व्यवस्था आणि पोलीस यंत्रणांनी समन्वयाने काम करून प्रवास सुलभ करावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व पुतळ्यांची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. या कामातील अडचणी तपासून पुढील पाच ते सात दिवसांत आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य राखण्यावर भर
महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य आणि पावित्र्य कायम राखण्यासाठी या दिवशी उत्सवी स्वरूपाचे कार्यक्रम टाळावेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. हा दिवस दुःखाचा आणि अभिवादनाचा असल्याने उत्सवी कार्यक्रमांऐवजी अनुयायांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील चित्रपट किंवा त्यांच्या विचारांशी सुसंगत उपक्रम आयोजित करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दादर स्थानकाच्या नामकरणाची प्रक्रिया अधिवेशनात
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ असे नाव देण्याच्या मागणीला राज्य शासनाने यापूर्वीच तत्त्वतः मान्यता देऊन केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे. या प्रक्रियेसंदर्भात विधानमंडळाच्या समितीबाबत केंद्राकडून मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्यानंतर स्थानकाच्या नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
इंदू मिल स्मारकासाठी वाढीव निधी देणार
इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून मुख्य पुतळ्याच्या कामासंदर्भात काही बाबी प्रलंबित आहेत. कामाच्या खर्चात वाढ झाली तरी त्याची भरपाई करण्यास शासन तयार आहे. उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन विषय मार्गी लावण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशभरातून चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांना सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. सर्व विभागांच्या समन्वयातून यंदाचा महापरिनिर्वाण दिन शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने पार पाडण्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.




