आदिवासी बांधवांच्या मदतीला धावले नगरसेवक निखिल बोऱ्हाडे; ४५० कुटुंबांना माणुसकीचा आधार!
आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम

– टोकावडे, शिरगाव आणि मंदोशी येथे ४५० किटचे वाटप
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
राजकीय नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त हार-तुरे, पुष्पगुच्छ आणि होर्डिंग्जवर होणाऱ्या खर्चाला फाटा देत समाजातील गरजू घटकांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा आदर्श भाजपा ‘क’ प्रभाग अध्यक्ष तथा नगरसेवक निखिल बोराडे यांनी घालून दिला आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमांतर्गत बोऱ्हाडे यांनी दुर्गम आदिवासी भागातील ४५० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटच्या माध्यमातून मदत करण्याचा संकल्प केला आहे. त्यापैकी ३९० किटचे वाटप पूर्ण झाले आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांचा २७ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. यानिमित्त वाढदिवसाचा उत्सव केवळ शुभेच्छा, सत्कार आणि प्रसिद्धीपुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी आदिवासी भागातील गरजू कुटुंबांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला.
हेही वाचा – ‘पंचायत’ वेब सीरिजचा पाचवा सीझन ३ डिसेंबरला रिलीज होणार; पुन्हा रंगणार फुलेरातील राजकारण!

टोकावडे, शिरगाव आणि मंदोशी या गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या ४५० किटचे वाटप करण्यात आले. दुर्गम भागातील गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचावी, यासाठी बोऱ्हाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नियोजन केले.
विशेष म्हणजे, राजकीय आणि सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना केवळ आपल्या प्रभागापुरते मर्यादित न राहता दुर्गम आदिवासी भागातील कुटुंबांच्या मदतीसाठी पुढे येण्याची भूमिका बोऱ्हाडे यांनी घेतली आहे. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून गरजूंच्या दैनंदिन गरजांना प्राधान्य देणारा हा उपक्रम ठरत आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या सेवाभावी अभियानात नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी घेतलेला पुढाकार लक्षवेधी ठरला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वळविण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे. लोकप्रतिनिधींचे कार्य केवळ विकासकामांपुरते मर्यादित नसून समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्या पाठीशी उभे राहणेही तितकेच महत्त्वाचे असल्याची भावना यातून अधोरेखित होत आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“आमदार महेशदादा लांडगे यांनी नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणाला आणि जनसेवेला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार-तुरे आणि होर्डिंग्जवर खर्च करण्याऐवजी दुर्गम आदिवासी भागातील गरजू कुटुंबांना मदत करण्याचा निर्णय घेतला. टोकावडे, शिरगाव आणि मंदोशी येथील ४५० कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या किट पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. त्यापैकी ३९० किटचे वाटप पूर्ण झाले आहे. समाजातील शेवटच्या घटकाच्या चेहऱ्यावर समाधान निर्माण करणे, हीच आमच्या नेत्याला वाढदिवसाची खरी भेट आहे. यापुढेही सामाजिक बांधिलकी जपत गरजूंच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर राहू.”
– निखिल बोऱ्हाडे, भाजपा ‘क’ प्रभाग अध्यक्ष तथा नगरसेवक.




