TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

रोहित पवारांच्या ‘मफलर मॅन’ आरोपांवर सुप्रिया सुळे यांची भूमिका; म्हणाल्या, ‘ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही’

व्हीएसआर विमान अपघात प्रकरणाच्या अहवालाची प्रतीक्षा करण्याचे आवाहन; शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत आणि सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘मफलर मॅन’चा फोटो दाखवत गंभीर आरोप केले होते. व्हीएसआर कंपनीचे मालक, त्यांची मालमत्ता आणि कथित गुन्हेगारी संबंधांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. या आरोपांनंतर भाजपकडून ही राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे का, असा सवाल केला जात होता. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद पक्षाच्या वतीने घेतलेली नसून, त्यांनी वैयक्तिक मत मांडले आहे, असे सुळे यांनी सांगितले.

रोहित पवार यांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, त्यांनी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये नेमके काय पाहिले किंवा त्यातून काय निष्कर्ष काढला, याची आपल्याला माहिती नाही. आपण रोहित पवार यांची संपूर्ण पत्रकार परिषद पाहिलेली नाही; मात्र वृत्तपत्रांमध्ये आलेली माहिती वाचली आहे. या विषयातील तांत्रिक बाबींवर भाष्य करण्यासाठी आपण नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रोहित पवार यांनी पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेतलेली नाही. त्यांनी स्वतःचे वैयक्तिक मत मांडले आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला पक्षाची अधिकृत भूमिका समजणे योग्य ठरणार नाही, असे सुळे यांनी नमूद केले. व्हीएसआर कंपनी आणि विमान अपघाताच्या विषयावर देशात अनेक तज्ज्ञ आहेत. या प्रकरणातील अहवालाची सर्वांनी प्रतीक्षा करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

मतदारसंघ पुनर्रचनेवर राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट

मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका यापूर्वीच मांडली असल्याचे त्यांनी सांगितले. या विधेयकाला सार्वजनिकरीत्या विरोध करणाऱ्या काही लोकांनी आपल्याशी संपर्क साधल्याचा उल्लेख करत, किती जणांनी प्रत्यक्ष विधेयक वाचले आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे या विषयातील मत महत्त्वाचे असल्याचे सुळे म्हणाल्या. पक्षाच्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेत आव्हाड यांचे मत घेतले जाईल. पक्षासाठी त्यांचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  परिणय फुके यांचा मुलाच्या अपघातावर खुलासा; म्हणाले, ‘यथार्थ गाडी चालवत नव्हता’

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे शेतकऱ्यांसाठी तातडीच्या मदतीची मागणी केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना दोन पत्रे दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, पाणीवाटप योग्य पद्धतीने व्हावे आणि विद्यार्थ्यांचे शाळा व महाविद्यालयांचे शुल्क माफ करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आल्याचे सुळे यांनी सांगितले.

ही राजकारण करण्याची वेळ नसून सरकारने संवेदनशीलतेने परिस्थिती हाताळावी, असे आवाहन त्यांनी केले. बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याचेही त्यांनी सांगितले. अशा शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याची माहिती सुळे यांनी दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group