“अजित पवारांच्या पुतळ्याचं अनावरण चकाट्या पिटणाऱ्या अमित शाह यांच्या हस्ते होणं हे दुर्भाग्य”; उद्धव ठाकरेंची टीका

मुंबई | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते १६ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी कोव्हिड काळात अजित पवार माझा फोन उचलायचे, पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फोन उचलत नसत, अशी टीका केली होती. या टीकेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतीदिनानिमित्त माध्यमांशी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमित शाह म्हणजे “चकाट्या पिटणारा गृहमंत्री” असल्याची बोचरी टीका करत उद्धव ठाकरेंनी शाह यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला.
उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
आज माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १४ वा स्मृती दिन आहे. तसंच हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. अरविंद भोसले या शिवसेना कार्यकर्त्याचं कौतुक करेन कारण दर महिन्याच्या १७ तारखेला बाळासाहेबांच्या स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबीर आयोजित करत असतो. अशी निष्ठा आपल्या नेत्याबाबत असणं हे आता दुर्मीळ झालं आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राजकारण राजकारणाच्या गतीने चाललं आहे. येत्या वर्षात बाळासाहेब ठाकरेंचं स्मृती दालन आहे त्याचं लोकार्पण करण्याचं आम्ही ठरवलं आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा
अमित शाह म्हणाले की कोव्हिड काळात अजित पवारांशी संपर्क व्हायचा, उद्धव ठाकरे फोनही उचलत नव्हते. याबाबत विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शाह किती दिवसांनी अवतीर्ण झाले आहेत? कारण दिल्लीत जे जेन झींचं आंदोलन झालं त्यावेळी अमित शाह लोकसभेत बाथरुमला जायचे पण सभागृहात जात नव्हते. असा हा चकाट्या पिटणारा गृहमंत्री देशाला लाभला आहे. त्यांनी चकाट्या पिटण्याशिवाय दुसरं काही केलंय असं वाटत नाही. खरं म्हणजे काल माझी अपेक्षा अशी होती, की ज्या अजित पवारांना ७० हजार कोटींचा घोटाळा केला म्हणून भ्रष्टाचाराचे आरोप करून, त्यांचं जगणं मुश्किल केलं होतं त्याच अजित पवारांचा पुतळा चकाट्या पिटणाऱ्या अमित शाहच्या हस्ते अनावरण होणं दुर्भाग्याचं होतं. मला वाटलं होतं अमित शाह अजित पवारांच्या पुतळ्यासमोर नाक रगडून माफी मागतील आणि म्हणतील की आम्ही तुमच्यावर केलेले आरोप खोटे होते. जी थोरवी त्यांनी काल गायली, त्यातले दोन शब्द अजित दादा हयात असताना बोलले असते तर अजित पवारांना समाधान झालं असतं. अशी खोटं बोलणारी माणसं, त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही.
करोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव होतं कारण त्यावेळी मुख्यमंत्री मी होतो. पण ते सगळं यश यंत्रणेचं होतं. तरीही मला हे वाटतं की हे सांगण्यात काय अर्थ आहे? कारण निर्बुद्ध माणसासमोर काहीही बोललं तरीही फरक पडेल असं वाटत नाही. आपल्याकडे एक म्हण आहे गाढवापुढे वाचली गीता.. तसं अमित शाह यांच्यापुढे काही बोलण्याची आवश्यकता आहे असं काही वाटत नाही. अशा चकाट्या पिटण्यापेक्षा त्यांनी मणिपूरमध्ये जायला हवं. अरुणाचलमध्ये आक्रोश सुरू आहे तिथे गेलं पाहिजे. सैन्याचं मनोधैर्य उंचावलं पाहिजे. पण चकाट्या पिटणाऱ्या माणसाच्या हातात देश आहे त्यामुळे रेजिम चेंजशिवाय पर्याय नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अमित शाह यांनी फोन केले आणि मी घेतले नाहीत हे घेतले नाहीत हे खरं असतं तर महाराष्ट्रात उत्तर प्रदेशसारखं चित्रं म्हणजे गंगेत प्रेतं सोडली गेली तसं चित्र दिसलं असतं. पण तसं झालं नाही याचा अर्थ महाराष्ट्रात जी यंत्रणा काम करत होती ते मोदींना थाळ्या पिटून जे जमलं नाही ते महाराष्ट्राने करून दाखवलं होतं. त्यामुळे असली भंपक माणसं जरूर घालवली पाहिजे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका आल्या आहेत त्यानिमित्ताने हे सांगतो आहे की तिथे जी काही हेळसांड झाली होती ती त्यांनी विसरू नये. खोटं बोलण्याखेरीज यांचं काहीही कर्तृत्व नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.




