TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

अजित पवारांच्या अपघाताचा अहवाल लवकर द्या; दोषी आढळल्यास कठोर कारवाई करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमित शाहांसमोर मुख्यमंत्र्यांची विनंती; सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदेंनीही अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा

पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास अहवाल लवकर समोर यावा, अशी विनंती आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. या अपघाताबाबत स्पष्टता येणे आवश्यक असून, तपासात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे महत्त्वपूर्ण विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे जिल्हा परिषद परिसरातील यशवंतराव चव्हाण भवन येथे अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात ते बोलत होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना मान्यवर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

अजितदादांचे मातीशी असलेले नाते कायम राहिले – सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या कार्याचा आणि त्यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख केला. ज्या पुणे जिल्हा परिषदेसाठी अजितदादांनी आयुष्य वेचले, त्याच जिल्हा परिषदेत आज त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हे त्यांच्या कर्तृत्वाचे प्रमाणपत्र असल्याचे त्या म्हणाल्या.

छत्रपती सहकारी साखर कारखान्यापासून जिल्हा परिषद, खासदार, आमदार आणि उपमुख्यमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळताना अजित पवार यांचे मातीशी असलेले नाते कधीही बदलले नाही. जनसेवा, जनकल्याण आणि विकासासाठी संघर्ष करणारे त्यांचे नेतृत्व होते, असे सांगताना सुनेत्रा पवार भावूक झाल्या.

अजित पवार आणि अमित शाह यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध आपण पाहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलही अजितदादांच्या मनात विशेष आदर होता. एखादा विषय हाती घेतल्यानंतर त्याचा सातत्याने पाठपुरावा करून तो मार्गी लावण्याची त्यांची कार्यपद्धती होती. शेतकरी, सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांसाठी त्यांनी केंद्र सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

अजितदादांच्या निधनानंतर राज्यातील नेतृत्वाकडून आपल्याला पूर्वीपेक्षा अधिक सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. काठेवाडी गावाला निर्मल ग्राम आणि संत गाडगे महाराज अभियानांतर्गत मिळालेल्या सन्मानात ग्रामस्थांसोबतच अजितदादांचेही योगदान असल्याची आठवण त्यांनी सांगितली.

हेही वाचा –  अजितदादांचा स्पष्टवक्तेपणा मला खूप आवडायचा; अमित शाहांनी सांगितले जुन्या आठवणींमधील किस्से!

‘फणस काटेरी असतो, पण आतून मधाळ असतो’; एकनाथ शिंदेंकडून आठवणींना उजाळा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव केला. अजितदादा हे केवळ पुतळ्याच्या चौकटीत सामावणारे व्यक्तिमत्त्व नव्हते. त्यांनी आमदार, खासदार, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प अकरा वेळा मांडला, असे शिंदे म्हणाले.

२८ जानेवारीला घडलेली दुर्घटना महाराष्ट्रासाठी काळा दिवस होता. या घटनेने सर्वांच्या मनाला वेदना झाल्या. अजितदादांनी उभारलेली विकासकामे आणि त्यांची काम करण्याची पद्धत कायम स्मरणात राहील, असे त्यांनी सांगितले.

विकासकामांच्या उद्घाटनावेळीही अजितदादा कामांची बारकाईने पाहणी करायचे. कुठे रंग निघाला आहे किंवा एखादे काम अपूर्ण राहिले आहे का, याकडे त्यांचे लक्ष असायचे. उभारण्यात येणाऱ्या वास्तूंचा जनतेला योग्य उपयोग झाला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा. “फणस काटेरी असतो, पण आतून मधाळ असतो, असेच अजितदादा होते,” अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या स्वभावाचे वर्णन केले.

अजितदादांच्या अपघाताचा अहवाल लवकर यावा – देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाचा मुद्दा उपस्थित केला. अपघाताचा अहवाल लवकर समोर यावा आणि घटनेबाबत स्पष्टता यावी, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे विनंती केल्याचे त्यांनी सांगितले. तपासात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांचे पुण्यावर विशेष प्रेम होते. ते केवळ महाराष्ट्राचे नेते नव्हते, तर पुण्याच्या विकासाबाबतही त्यांना विशेष आस्था होती. कणखर, शिस्तबद्ध आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती, असे फडणवीस म्हणाले.

अजितदादांनी अनेक अर्थसंकल्प मांडले; मात्र आर्थिक शिस्त कधीही मोडू दिली नाही. विकासकामांसाठी निधी देताना कामाचा दर्जा आणि गुणवत्ता याबाबत त्यांचा आग्रह असायचा. राजकारणात स्पष्टपणे हो किंवा नाही सांगण्याची हिंमत फार कमी लोकांमध्ये असते. अजितदादा मात्र जे पटले त्याला होकार द्यायचे आणि जे पटले नाही त्याला स्पष्ट नकार द्यायचे. एखाद्या कामाला होकार दिल्यानंतर ते पूर्ण होईपर्यंत त्याच्या पाठीशी उभे राहायचे, असे फडणवीस यांनी सांगितले.

अजित पवार यांचे नेतृत्व महाराष्ट्रात अधिक बहरत असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून, पुतळ्याच्या अनावरणावेळी सर्वांच्या मनात त्यांच्या आठवणी दाटून आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group