राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा चर्चेत; संजय शिरसाटांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
‘विलीनीकरण, ऑपरेशन टायगर आणि राजकीय समीकरणांची चर्चा’; अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरणापूर्वी शिरसाटांचे सूचक विधान

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. पुणे जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे.
“अमित शाह जिथे जातात, तिथे आपला ठसा उमटवतात. इतिहास पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात निश्चित काही घडामोडी घडतील. राजकीय समीकरणे असतील किंवा इतर बाबी असतील, अमित शाह यांच्या भेटीनंतर निश्चित चर्चा होईल,” असे संजय शिरसाट म्हणाले.
विलीनीकरण की ऑपरेशन टायगर?
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या विलीनीकरणाची चर्चा गेल्या १५ ते २० दिवसांपासून सुरू असल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले. तसेच ‘ऑपरेशन टायगर’ आणि इतर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव याबाबतही चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी पुणे दौऱ्यासाठी वेळ घेतला असावा, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके विलीनीकरण होणार की ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून काही नवी राजकीय समीकरणे तयार होणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांकडून यापूर्वी विलीनीकरणाचे दावे फेटाळण्यात आले आहेत.
हेही वाचा – अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यात राजकीय भेटीगाठींना वेग; फडणवीस, शिंदे यांच्यासह नेत्यांची भेट
अजित पवार यांच्या अपघात प्रकरणावर शिरसाटांची प्रतिक्रिया
दरम्यान, अजित पवार यांच्या अपघात प्रकरणावरूनही संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात ‘मफलर मॅन’चा उल्लेख केला आहे. यावर बोलताना शिरसाट म्हणाले की, अजित पवार यांचा मृत्यू घातपात होता की अपघात, हे प्रकरण निकाली निघाले पाहिजे. रोहित पवार यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांनी ती उघड करावी आणि पोलिसांना सहकार्य करावे. पोलीस या प्रकरणात कायदेशीर पद्धतीने सहकार्य करतील, असेही ते म्हणाले.
नवनाथ बन यांची रोहित पवारांवर टीका
भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनीही रोहित पवार यांच्यावर टीका केली. “रोहित पवारांना स्टंटबाजी करायची सवय आहे. मागच्या १० तारखेला ते पत्रकार परिषद घेणार होते. आता पुन्हा पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगत आहेत. ही स्टंटबाजी असून चर्चेत राहण्याचा प्रयत्न आहे,” असे बन म्हणाले.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा कायम
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या संभाव्य विलीनीकरणाभोवती सध्या राज्यातील राजकीय चर्चा फिरत आहे. दोन्ही गटांकडून विलीनीकरणाचे दावे वारंवार फेटाळले जात असले, तरी राजकीय वर्तुळातील चर्चा थांबलेली नाही. शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्यानंतर या चर्चांना सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. पार्थ पवार यांनीही सिल्व्हर ओक येथे दोन वेळा भेट दिल्याची माहिती समोर आली होती.
अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यानंतर राज्याच्या राजकारणात कोणत्या नव्या घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे




