बंगालच्या उपसागरात ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका; महाराष्ट्रातील हवामानावर काय परिणाम होणार? वाचा सविस्तर

Cyclone Akvan | बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून, आज (सोमवार) संध्याकाळपर्यंत या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. इराणने सुचवलेल्या नामकरण प्रणालीअंतर्गत या चक्रीवादळाला ‘अक्वान’ असे नाव देण्यात आले आहे. हे चक्रीवादळ हळूहळू वायव्य दिशेला सरकत असून, या सक्रिय हवामान प्रणालीमुळे देशातील चार प्रमुख राज्यांमध्ये मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात काही दिवसांपूर्वी ‘अर्णब’ आणि ‘मुरासू’ चक्रीवादळांची निर्मिती झाली होती. आता पुन्हा एकदा ‘अक्वान’ चक्रीवादळ सक्रिय होत असल्याने आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांसह पुद्दुचेरी, कराईकल तसेच अंदमान आणि निकोबार बेटांवर पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्यांत पावसाची तीव्रता सर्वाधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महाराष्ट्रातील हवामानावर काय परिणाम होणार?
बंगालच्या उपसागरातील ‘अक्वान’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नाही. मात्र, हे वादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकल्यानंतर २० आणि २१ नोव्हेंबर दरम्यान पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांच्या आसपास तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची किंवा ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. यामुळे राज्याच्या दक्षिण भागात दिवसाचा उकाडा कमी होऊन गारवा जाणवेल.
हेही वाचा
राज्यात थंडीला सुरुवात; मालेगाव १३.६ अंशांवर
सध्या उत्तर भारतातील सक्रिय हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील बहुतांश भागांत किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट झाली असून पहाटेच्या वेळी चांगलाच गारवा जाणवू लागला आहे. आगामी काही दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागातील तापमानात आणखी १ ते २ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.
सोमवारी राज्यातील विविध शहरांत नोंदवलेल्या किमान तापमानाचा आढावा घेता, मालेगाव येथे सर्वात कमी १३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, त्याखालोखाल सातारा, नाशिक आणि यवतमाळ येथे प्रत्येकी १४.० अंश सेल्सिअस, नागपूर येथे १४.६ अंश सेल्सिअस, महाबळेश्वर येथे १५.० अंश सेल्सिअस, वाशीम येथे १५.४ अंश सेल्सिअस, अमरावती येथे १५.९ अंश सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर येथे १६.० अंश सेल्सिअस, वर्धा येथे १६.५ अंश सेल्सिअस, सांगली येथे १६.८ अंश सेल्सिअस आणि कोल्हापूर येथे १७.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले; तर कोकण किनारपट्टीवर मुंबई (सांताक्रूझ) येथे १८.७ अंश सेल्सिअस (कुलाबा २३.४ अंश सेल्सिअस), डहाणू येथे १८.८ अंश सेल्सिअस आणि हर्णे येथे २२.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.




