आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न; एकनाथ शिंदेंचे प्रतिपादन
जनजातीय गौरव दिनानिमित्त गडचिरोलीत भव्य सोहळा; बिरसा मुंडा यांच्या विचारांतून आदिवासी विकासाला चालना देण्याचे आवाहन

गडचिरोली : भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त देशभरात जनजातीय गौरव दिन साजरा केला जात आहे. यानिमित्त गडचिरोली येथे देशस्तरीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला राज्य सरकारमधील अनेक मंत्री उपस्थित असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. कार्यक्रमापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासी समाजाच्या विकासाबाबत सरकारची भूमिका मांडली.
एकनाथ शिंदे यांनी जनजातीय गौरव दिनानिमित्त आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा दिवस जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. आदिवासी समाजाला न्याय देणे आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे शिंदे म्हणाले.
भगवान बिरसा मुंडा यांनी वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी देशासाठी बलिदान दिले. त्यांच्या कार्याचा आणि त्यागाचा सन्मान म्हणून त्यांना ‘धरती आबा’ ही उपाधी देण्यात आली. आदिवासी समाजासाठी केवळ त्यांच्या पुतळ्याला हार घालणे पुरेसे नाही, तर त्यांच्या जीवनात विकास आणि सकारात्मक बदल घडवून आणणे महत्त्वाचे आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना आणि निर्णय राबवले जात आहेत. वनहक्क पट्टे देणे, आदिवासी समाजाला त्यांचे हक्क मिळवून देणे आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्या, हीदेखील महत्त्वाची बाब असल्याचे शिंदे म्हणाले.
हेही वाचा – राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग? अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
मुख्यमंत्री फडणवीस दोन दिवसांच्या गडचिरोली दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या गडचिरोली दौऱ्यावर आहेत. जनजातीय गौरव दिन आणि भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमासाठी ते गडचिरोली पोलीस मुख्यालयात उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आदिवासी विकास मंत्री आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात देशातील विविध राज्यांतून आलेले आदिवासी बांधव पारंपरिक कला आणि नृत्यांचे सादरीकरण करणार आहेत. गडचिरोली जिल्ह्याचे दुर्गम भौगोलिक स्वरूप आणि कार्यक्रमाचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.




