Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

दिवाळीच्या आतषबाजीचा महाराष्ट्राला फटका; मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक शहरांत आगीच्या दुर्घटना

ठाण्यात १७ मजली इमारतीला आग, पुण्यात सहा तासांत २४ घटना; कळवणमध्ये किराणा गोदामाचे सुमारे साडेतीन कोटींचे नुकसान

मुंबई : राज्यभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आणि अन्य कारणांमुळे आगीच्या अनेक दुर्घटना घडल्या. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, चंद्रपूर आणि अहिल्यानगरसह विविध ठिकाणी आगीच्या घटना समोर आल्या. बहुतांश ठिकाणी अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली; मात्र अनेक ठिकाणी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.

ठाण्यात १७ मजली इमारतीला आग

ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक २ येथील रहेजा गार्डन संकुलातील ‘कार्लाय’ या १७ मजली इमारतीला रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास आग लागली. इमारतीच्या आठव्या मजल्यावर लागलेली आग काही वेळात १४ व्या मजल्यापर्यंत पोहोचली. ठाणे आणि मुंबई अग्निशमन दलाच्या १० ते १५ गाड्यांच्या मदतीने सुमारे सहा तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन विभागाने इमारतीत अडकलेल्या ५० हून अधिक रहिवाशांसह पाळीव प्राण्यांची सुरक्षित सुटका केली. याशिवाय रहेजा गार्डन आणि कळवा परिसरातील आशर अरिज येथेही आगीच्या घटना घडल्या.

घटनेची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अग्निशमन दलाच्या कामाचे कौतुक केले आणि फटाक्यांच्या वापराबाबत कडक नियमावली करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्ह्यात रॉकेट आणि हवेत उडवून फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांवर तातडीने बंदी घातल्याची माहिती आहे. इतर फटाके केवळ खुल्या मैदानात फोडण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

नवी मुंबईत धुराचे साम्राज्य; सीवूड्समध्ये सोसायटीला आग

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेल्या आतषबाजीमुळे नवी मुंबईतील काही भागांत मोठ्या प्रमाणात धूर पसरला. काही ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ४५० पर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सीवूड्स येथील माऊली सोसायटीच्या सहाव्या मजल्यावर फटाक्याची ठिणगी पडल्याने आग लागली. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले.

हेही वाचा –  दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देणार; एकही शेतकरी वंचित राहणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

मुंबईत विविध ठिकाणी आगीच्या घटना

मुंबईतील विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळील ‘स्कायलाईन विहार’ या व्यावसायिक इमारतीच्या वरच्या मजल्यांना रात्री अकराच्या सुमारास आग लागली. या आगीत इमारतीचे तीन मजले प्रभावित झाल्याची माहिती आहे.

याशिवाय कुर्ला पश्चिमेतील वसलानी इस्टेटमधील गोदाम, मुलुंड पूर्वेकडील एम. जी. रोडवरील इमारतीचा टेरेस, डोंगरी पोलीस ठाण्यासमोरील दुकाने आणि अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतही आग लागल्याच्या घटना घडल्या.

पुण्यात सहा तासांत २४ ठिकाणी आग

पुणे शहरात दिवाळीच्या काळात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली. दुपारी तीन ते रात्री नऊ या सहा तासांच्या कालावधीत तब्बल २४ ठिकाणी आग लागल्याची नोंद झाली. येरवडा, सदाशिव पेठ, वडगाव आणि खराडी परिसरात या घटना घडल्या. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनांमध्ये जीवितहानी झाली नसल्याची माहिती देण्यात आली.

नागपूर, चंद्रपूर आणि अहिल्यानगरमध्ये नुकसान

नागपूरमधील सावरकरनगर येथील साई डायनामिक्स टीव्हीएस शोरूमला फटाक्यांमुळे आग लागल्याने अनेक दुचाकी जळून खाक झाल्या. शंकरपूर परिसरातील एका फ्लॅटलाही आग लागली. चंद्रपूरमधील बालाजी वॉर्डात फटाक्याची ठिणगी उडून एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील अकोले रोडवरील बॅटरीच्या दुकानाला आग लागून दोन दुकानांचे मोठे नुकसान झाले.

कळवणमध्ये किराणा गोदामाला आग; साडेतीन कोटींचे नुकसान

नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील सबस्टेशन रोडवरील ‘आर. के. ट्रेडर्स’ या होलसेल किराणा मालाच्या गोदामाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भीषण आग लागली. या आगीत गोदामातील कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक झाला असून इमारतीचेही मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दिवाळीच्या उत्साहात फटाके फोडताना सुरक्षिततेची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनांमधून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group