दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देणार; एकही शेतकरी वंचित राहणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही
नागपूर जिल्ह्यातील कोहळी आणि सोनेगाव येथे शेताच्या बांधावर जाऊन पाहणी; वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी सौर कुंपणाची योजना प्रभावीपणे राबविणार

नागपूर : पावसाअभावी कापूस आणि तुरीची पिके सुकत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अशा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आवश्यक मदत देण्यात येईल. तसेच मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे मुक्काम केला होता. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि दुष्काळाच्या संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला.
लोहारी सावंगा येथून सकाळी त्यांनी सोनेगाव येथे शेतकरी दिलीप सरोदे यांच्या शेताला भेट दिली. पावसाअभावी कापसाची वाढ खुंटली असून बोंडेदेखील फुटली नसल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडून घेतली. संकटाच्या काळात खचून न जाता शेतकऱ्यांना मदत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
दुष्काळामुळे पिकांचे नुकसान होत असतानाच वन्यप्राण्यांमुळेही शेतीचे नुकसान होत असल्याची व्यथा दिलीप सरोदे यांनी मांडली. पिकांच्या संरक्षणासाठी सौर कुंपण उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. यावर वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी सौर कुंपणाची योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
यानंतर मुख्यमंत्र्यांनी कळमेश्वर तालुक्यातील कोहळी येथील शेतकरी बाबुराव काळे यांच्या शेताला भेट दिली. तेथे कापूस आणि तुरीच्या पिकांची पाहणी करून पावसाअभावी झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. शेतकऱ्यांना नुकसानीपोटी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देण्यात आली असून उर्वरित मदतही त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
दुष्काळी मदतीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक असली, तरी सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन ऑनलाइन नोंदणीऐवजी ऑफलाइन नोंदणीची सवलत देण्यात आली आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
दुष्काळी परिस्थितीत आवश्यकतेनुसार धान्य उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे शिधापत्रिका नाही, अशा शेतकऱ्यांची प्राधान्याने नोंदणी करून त्यांनाही या योजनेचा लाभ द्यावा, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
या पाहणी दौऱ्यात आमदार चरणसिंग ठाकूर, राजीव पोतदार, शेतकरी वसंतराव चापले, संदीप सरोदे, दिनेश दापले, सरपंच बिपीन चापले, नलिनी सतीश रेवतकर, मनोहर कुंभारे तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा




