राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची कोणतीही चर्चा नाही; अनिल पाटील यांचे स्पष्ट विधान
अजितदादांच्या निधनानंतर वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत विलीनीकरण न करण्याचा निर्णय झाल्याचा दावा; जिल्हा बँकेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणावरून राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले असताना, या विषयावर कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार अनिल पाटील यांनी स्पष्ट केले आहे. खासदार सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत विलीनीकरण होणार नसल्याचा निर्णय झाल्याचा दावा पाटील यांनी केला.
विलीनीकरणाच्या चर्चेला अर्थ नाही : अनिल पाटील
सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्यासोबत यापूर्वी विलीनीकरणाबाबत चर्चा केली असेल; मात्र ती चर्चा आता मागे पडली आहे. त्यामुळे सध्या विलीनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट चित्र असल्याचे अनिल पाटील म्हणाले.
प्रफुल्ल पटेल हे अजित पवार हयात असताना त्यांच्यासोबत अनेक महत्त्वाच्या ठिकाणी भेटीगाठी घेत होते. आता शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी त्यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. काही हितचिंतक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शरद पवार एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतात, असे पाटील म्हणाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक भाषणांमध्ये शरद पवार यांचा उल्लेख आपले राजकीय गुरू म्हणून करतात. त्यामुळे शरद पवार यांना मोदींचे नेतृत्व मान्य असेल, तर त्यांनी आपला पक्ष एनडीए सरकारमध्ये सहभागी करून स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा विचार करावा, असे मत अनिल पाटील यांनी व्यक्त केले.
सत्तेत सहभागी झाल्यास शरद पवार यांच्या पक्षाला मोठा वाटा मिळू शकतो, असेही ते म्हणाले. विलीनीकरणाबाबत वारंवार चर्चा करून विरोधक हा विषय दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. विलीनीकरणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे असल्याचेही पाटील यांनी नमूद केले.
काँग्रेसमधील गटबाजीवरून वडेट्टीवार यांच्यावर टीका
अजित पवार यांच्या पक्षाचे दोन गट झाल्याच्या टीकेला उत्तर देताना अनिल पाटील यांनी काँग्रेसमधील गटबाजीचा मुद्दा उपस्थित केला. अजित पवार यांच्या पक्षातील दोन गटांवर बोलण्याऐवजी काँग्रेसमध्ये किती गट झाले आहेत, याकडे विजय वडेट्टीवार यांनी लक्ष द्यावे, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेसमध्ये अनेक गट असल्याचा दावा करत वडेट्टीवार यांनी आधी आपल्या पक्षातील मतभेद मिटवावेत, असेही पाटील म्हणाले.
जिल्हा बँकेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवणार
जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबतही अनिल पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. यासंदर्भात यापूर्वी एक-दोन बैठका झाल्या असून, निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळीनंतर युती आणि जागावाटपाबाबत बैठक घेऊन अंतिम निर्णय केला जाईल.
आपल्या पक्षाने सात जागांची मागणी केली असली, तरी पक्षांचे संख्याबळ आणि उमेदवारांची ताकद लक्षात घेऊनच जागावाटप होईल. जिल्हा बँकेची निवडणूक केवळ राजकीय वातावरणावर अवलंबून नसून ठराव, उमेदवार आणि त्यांची निवडून येण्याची क्षमता महत्त्वाची असते, असे पाटील यांनी स्पष्ट केले. माघारीनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.




