Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

फार्मर आयडीपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा; महसूल विभागाची नवीन कार्यपद्धती जाहीर

ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत अपवादात्मक प्रकरणांतील शेतकऱ्यांनाही मिळणार फार्मर आयडी; तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदारांकडून कागदपत्रांची त्रिस्तरीय पडताळणी

मुंबई : ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना फार्मर आयडी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जमिनीची नोंद किंवा लागवडीची माहिती उपलब्ध नसल्यामुळे फार्मर आयडीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही आता हा आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून महसूल विभागाने यासंदर्भातील नवीन कार्यपद्धतीचे परिपत्रक जारी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पात्र शेतकऱ्यांना सरकारी योजनांचे लाभ, अनुदान, पीक कर्ज, पीकविमा आणि डिजिटल कृषी सेवांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. ॲग्रीस्टॅक प्रणालीमध्ये काही अपवादात्मक प्रकरणांमुळे फार्मर आयडी न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने स्वतंत्र प्रक्रिया निश्चित केली आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आयडी?

नवीन कार्यपद्धतीनुसार, १ जानेवारी २०१५ पूर्वीपासून शेती कसत असलेले आणि आजही संबंधित जमीन ताब्यात ठेवून प्रत्यक्ष लागवड करणारे शेतकरी या प्रक्रियेसाठी पात्र ठरू शकतात. मात्र, त्यांच्याकडे शेती कसत असल्याचा किमान एक पुरावा असणे आवश्यक आहे.

याशिवाय अधिकृत भाडेपट्टा किंवा करार शेती करणाऱ्या व्यक्ती, शासनाकडून जमीन मंजूर अथवा वाटप झालेल्या पात्र व्यक्ती आणि शासन निर्णयात नमूद केलेल्या अन्य समतुल्य अपवादात्मक प्रकरणांतील शेतकऱ्यांनाही फार्मर आयडी देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा –  प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास कक्ष; २० नोव्हेंबरपर्यंत ५०० चौरस फूट जागा उपलब्ध करण्याचे निर्देश

तीन स्तरांवर होणार कागदपत्रांची पडताळणी

फार्मर आयडी जारी करण्यापूर्वी तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार अशा तीन स्तरांवर संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.

प्रथम तलाठी अर्थात ग्राम महसूल अधिकारी संबंधित गावातील जुने आणि अद्ययावत महसुली अभिलेख तपासतील. यामध्ये जमीन महसूल भरल्याच्या पावत्या, इनाम नोंदवही, सनद, भाडेपट्टा किंवा करारपत्र, जमीन मंजुरी आदेश आणि क्षेत्र निश्चितीसाठी आवश्यक असलेल्या अन्य अधिकृत कागदपत्रांचा समावेश असेल. या पडताळणीसाठी आधारभूत असलेल्या कागदपत्रांच्या प्रती प्रणालीमध्ये अपलोड करणे आवश्यक राहील. तसेच पात्र शेतकऱ्यांची यादी ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून चावडीवर प्रसिद्ध केली जाईल.

तलाठ्यांकडून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंडळ अधिकारी संबंधित माहिती आणि कागदपत्रांची पडताळणी करतील. त्यानंतर तहसीलदारांकडून तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी तपासलेल्या कागदपत्रांची छाननी केली जाईल.

तहसीलदारांची मान्यता मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या शेतहिश्शाला फार्मर आयडी जारी केला जाईल.

महसूल विभागाच्या या निर्णयामुळे जमिनीच्या नोंदी किंवा लागवडीच्या माहितीअभावी ॲग्रीस्टॅक प्रणालीत नोंदणीपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच अधिकाधिक शेतकऱ्यांना डिजिटल कृषी व्यवस्थेशी जोडण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group