अजितदादांची इच्छा असती तर १२ फेब्रुवारीलाच राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाले असते; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा
अजित पवार यांनी विलिनीकरणाची संपूर्ण प्रक्रिया सांगितली होती, असा तटकरे यांचा दावा; सध्या दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबत कोणतीही चर्चा नसल्याचे स्पष्ट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. अजित पवार यांनी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची कल्पना आपल्याला दिली होती. अजितदादा हयात असते, तर १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण झाले असते, असा दावा तटकरे यांनी केला आहे.
सुनील तटकरे यांच्या माहितीनुसार, अजित पवार यांनी विलिनीकरणाची संपूर्ण प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडेल, याबाबत सविस्तर माहिती दिली होती. या विलिनीकरणाबाबत अजितदादांची प्रबळ इच्छाशक्ती होती. त्यामुळे ते हयात असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण निश्चितपणे झाले असते, असे तटकरे यांनी म्हटले आहे.
मात्र, अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे विलिनीकरणाचा विषय त्याच टप्प्यावर थांबला. त्यांच्या निधनानंतर या प्रक्रियेबाबत पुढील चर्चा होऊ शकली नाही, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा; राजकीय नेत्यांसह गांधी कुटुंबीयांकडूनही विचारपूस
सध्या विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नाही
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सध्या कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. अजितदादा आज हयात असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आलेले दिसले असते, असेही त्यांनी नमूद केले.
तटकरे यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, सध्या विलिनीकरणाबाबत कोणताही निर्णय किंवा अधिकृत चर्चा सुरू नसल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.




