TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा; राजकीय नेत्यांसह गांधी कुटुंबीयांकडूनही विचारपूस

ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू; प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनेत्रा पवार, संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी घेतली भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राज्यातील दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर असताना त्यांना कफ आणि अशक्तपणाचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पुढील वैद्यकीय तपासण्यांसाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी विविध राजकीय पक्षांतील नेते आणि मान्यवर रुग्णालयात भेट देत आहेत.

शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गुरुवारी (५ नोव्हेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल रुग्णालयात दाखल झाले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ विविध विषयांवर चर्चा झाली. मंत्री छगन भुजबळ यांनीही त्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीदेखील रुग्णालयात जाऊन शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. संजय राऊत यांनी भेटीदरम्यान त्यांना ‘बोध कीर्तन’ हे पुस्तक भेट दिले. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई आणि उद्योगपती गौतम अदानी यांनीही रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा –  मुंबईतील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना २०२८ पर्यंत हक्काचे घर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांचे फोन

शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना फोन केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही फोनवरून त्यांच्या तब्येतीची माहिती घेतली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील फोन करून शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही शरद पवार यांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. गांधी कुटुंबीयांनी फोनवरून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

प्रकृतीत सुधारणा; डिस्चार्जबाबत उत्सुकता

शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यांना आज किंवा उद्यापर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, डिस्चार्जबाबतचा अंतिम निर्णय डॉक्टरांच्या तपासणीनंतरच घेतला जाणार आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीची विविध पक्षांतील नेत्यांकडून घेतली जात असलेली विचारपूस लक्षवेधी ठरत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group