रखडलेले SRA प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्प सरसावणार; एकनाथ शिंदे यांचे निर्देश
थकीत संक्रमण सदनिकांचे भाडे वसूल करण्यावर भर; कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरमधील समूह पुनर्विकास आणि ९,९२० परवडणाऱ्या घरांच्या प्रस्तावांचा आढावा

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) रखडलेल्या काही प्रकल्पांची जबाबदारी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाने स्वीकारून हे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण होतील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी दिले.
शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या संचालक मंडळाची ४५ वी बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक लहू माळी तसेच संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
संक्रमण सदनिकांच्या थकीत भाड्याच्या वसुलीला गती द्या
सप्टेंबर २०२६ अखेरच्या आढाव्यानुसार खासगी विकासकांकडे वितरित करण्यात आलेल्या ६६७ संक्रमण सदनिकांच्या भाड्यापोटी मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. ही थकीत रक्कम प्राधान्याने वसूल करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
सवलतींचा विचार करून निश्चित करण्यात आलेली थकीत रक्कम वसूल करण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करावा. तसेच वसुली प्रक्रियेला गती देऊन निर्धारित कालमर्यादेत थकबाकी जमा करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – स्वयंअर्थसहाय्यित शाळांसाठी शिक्षण विभागाचे नवे डिजिटल पोर्टल सुरू; १० शासकीय सेवा होणार ऑनलाइन
कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरमधील समूह पुनर्विकासाला गती
कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर परिसरातील समूह पुनर्विकास योजनांना गती देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सहा समूहांचा पुनर्विकास प्रस्तावित आहे. तर उल्हासनगरमध्ये २९ पेक्षा अधिक समूहांच्या पुनर्विकासाची प्रक्रिया पुढे नेण्यात येत आहे.
या योजनांसाठी आवश्यक सर्वेक्षण, नियोजन आणि सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
९,९२० परवडणारी घरे उभारण्याच्या प्रस्तावाचा आढावा
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बदलापूर येथील जोवेली येथे ४ हजार ५९० आणि कल्याण तालुक्यातील माणिवली येथे ५ हजार ३३० अशी एकूण ९ हजार ९२० परवडणारी घरे उभारण्याच्या प्रस्तावाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.
हे सर्व प्रकल्प गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावेत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे वास्तुविशारद आणि विकासक यांना सहभागी करून घ्यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
शिवशाही प्रकल्पाच्या कामकाजात सुधारणा करण्यावर चर्चा
शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या कामकाजाला अधिक गती देण्यासाठी सुधारित आकृतिबंध आणि सेवाशर्ती नियमावलीबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. रखडलेले पुनर्वसन प्रकल्प, थकीत भाड्याची वसुली आणि समूह पुनर्विकास योजनांची अंमलबजावणी यांना प्राधान्य देऊन कामे वेळेत पूर्ण करण्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भर दिला.




