राष्ट्रवादीतील नाराजीवर पार्थ पवारांचा तोडगा? कोअर कमिटीला विचारून निर्णय घेण्याचा शब्द
झिशान सिद्दीकी आणि उमेश पाटील यांच्या नियुक्त्या कायम; सहा महिन्यांनंतर कामगिरीचा आढावा घेणार, बैठकीतील सूत्रांची माहिती

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत नाराजी आणि नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवरून सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षातील मतभेदांवर पूर्णपणे तोडगा निघाला नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, यापुढे महत्त्वाचे निर्णय कोअर कमिटीला विचारात घेऊनच घेतले जातील, असा शब्द पार्थ पवार यांनी दिल्याचे समजते. त्यामुळे पक्षातील नाराजी दूर करण्याच्या दृष्टीने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
कोअर कमिटीच्या बैठकीला प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या बैठकीला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचा एक गट पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यामुळे कोअर कमिटीच्या बैठकीत या नाराजीवर काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
यापुढे कोअर कमिटीला विचारून निर्णय घेणार?
पक्षातील अंतर्गत वादावर पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी बैठकीत जाहीरपणे भाष्य केले नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यापुढे पक्षातील महत्त्वाचे निर्णय घेताना कोअर कमिटीला विश्वासात घेतले जाईल, अशी भूमिका पार्थ पवार यांनी मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
यामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. मात्र, अंतर्गत मतभेद पूर्णपणे मिटले आहेत की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा – ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपची चौकशी सुरू; जरांगेंची SIT समोर क्लिप देण्याची तयारी
झिशान सिद्दीकी आणि उमेश पाटील यांच्या नियुक्त्या कायम
पार्थ पवार यांच्या आदेशाने अलीकडेच झिशान सिद्दीकी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी, तर उमेश पाटील यांची राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्त्या करताना कोअर कमिटीला विश्वासात घेतले नसल्याने पक्षातील काही वरिष्ठ नेते नाराज असल्याची चर्चा होती.
या नियुक्त्यांबाबत फेरविचार होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, बुधवारी झालेल्या बैठकीत या नियुक्त्या कायम ठेवण्याची भूमिका मांडण्यात आल्याचे समजते. झिशान सिद्दीकी आणि उमेश पाटील यांना पुढील सहा महिने काम करण्याची संधी दिली जाणार असून, त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या पदांबाबत संभ्रम कायम
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या पदांबाबतचा संभ्रम अद्याप कायम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे कोअर कमिटीच्या बैठकीनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पूर्णपणे शांत झाले आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
एकूणच, पार्थ पवार यांनी कोअर कमिटीला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याचा शब्द दिल्याचे समजत असले, तरी पक्षातील नाराजी आणि नेतृत्वाशी संबंधित प्रश्नांवर पुढील काळात काय भूमिका घेतली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




