शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये कधी जमा होणार? एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून ५ हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर; दिवाळीपूर्वी पैसे देण्याचे नियोजन, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होणार.

Maharashtra Farmer News : यंदा राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतातील पिके करपून गेली असून, जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यातच दिवाळीचा सण तोंडावर असल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ५ हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात नेमकी कधी जमा होणार, याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
दिवाळीपूर्वी मदत देण्याचे सरकारचे नियोजन
नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीबाबत घोषणा केली. राज्यातील दुष्काळाचे संकट मोठे असल्याने मुख्यमंत्री, मंत्री, आमदार आणि खासदार शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. त्यानंतर सरकारने दुष्काळ जाहीर केला असून, दुष्काळातील विविध लाभ आणि नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये, यासाठी सरकारने ५ हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. यासाठी साडेसात हजार कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले असून, पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी मिळावी, असे नियोजन सरकारने केले असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
५ हजार रुपये तातडीची मदत; पुढेही भरपाई मिळणार
विरोधकांकडून ५ हजार रुपयांच्या मदतीवर प्रश्न उपस्थित केले जात असले, तरी ही रक्कम तातडीचा दिलासा म्हणून दिली जात असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर आणि ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे, तेथील शेतकऱ्यांना पुढील नुकसानभरपाईही दिली जाणार आहे.
शेतकऱ्यांना मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. केंद्र सरकारकडूनही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – MLC Election : शपथ घेण्यापूर्वीच दोन अपक्ष आमदार भाजपमध्ये; JDU ला मोठा राजकीय धक्का!
काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात
दरम्यान, शनिवारपासून राज्यातील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये ५ हजार रुपयांची मदत जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ही रक्कम एकाच वेळी जमा होणार नाही. टप्प्याटप्प्याने पैसे पाठवले जाणार असल्याने काही शेतकऱ्यांना रक्कम मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते.
खात्यात पैसे जमा झाले नसतील तर काय करावे?
सरकारकडून सुरुवातीला मदतीचा निधी तहसील कार्यालयाकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीशी लिंक असलेल्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती आहे.
त्यामुळे अद्याप खात्यात ५ हजार रुपये जमा झाले नसतील, तर शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी आणि त्याला जोडलेले बँक खाते तपासावे. तसेच मदतीच्या वितरणाबाबत तहसील कार्यालयात चौकशी करावी.
या मदतीच्या रकमेतून कोणत्याही प्रकारची कपात करू नये, अशा सूचना बँकांना देण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण ५ हजार रुपयांची रक्कम मिळणे अपेक्षित आहे.




