TOP News । महत्त्वाची बातमीBreaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदींची केवडियातील महाराष्ट्र पर्यटन दालनाला भेट; पैठणी विणकामाची घेतली माहिती

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त गुजरातच्या एकतानगरमध्ये महाराष्ट्राच्या पर्यटनवैभवाचे प्रदर्शन; गड-किल्ले, खाद्यसंस्कृती, हस्तकला आणि लोककला ठरत आहेत आकर्षण

मुंबई : राष्ट्रीय एकता दिन आणि ‘भारत पर्व २०२६’ निमित्त गुजरातमधील केवडिया (एकतानगर) येथे आयोजित उपक्रमात महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने विशेष पर्यटन दालन उभारण्यात आले आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या या दालनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या पारंपरिक पैठणी साड्यांची पाहणी करून पैठणी विणकामातील कलाकुसर आणि पारंपरिक तंत्राची माहिती जाणून घेतली.

या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी पैठणी विणकामातील बारकावे, त्यामागील पारंपरिक तंत्र आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रपरंपरेची माहिती घेतली. या माध्यमातून राज्यातील पारंपरिक कला, हस्तकला, सांस्कृतिक वारसा आणि कारागिरांच्या कौशल्याचे दर्शन त्यांना घडले. पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक विजय जाधव आणि त्यांच्या टीमने पंतप्रधानांचे स्वागत केले.

महाराष्ट्राच्या पर्यटनवैविध्याचे प्रदर्शन

गुजरातमधील केवडिया (एकतानगर) येथे १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय एकता दिन आणि भारत पर्व २०२६ च्या निमित्ताने महाराष्ट्र पर्यटन विभागही यात सहभागी झाला आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या विशेष दालनातून महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळे, सांस्कृतिक वारसा, पारंपरिक कला, खाद्यसंस्कृती आणि हस्तकलेचे दर्शन देशभरातील पर्यटकांना घडविण्यात येत आहे.

या उपक्रमासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाचे प्रतिनिधी म्हणून छत्रपती संभाजीनगरचे विभागीय उपसंचालक विजय जाधव उपस्थित आहेत. दालनात राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांची माहिती देणारी माहितीपत्रके आणि पर्यटनविषयक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच पैठणी विणकामाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि हस्तकलेच्या विविध वस्तू ही दालनाची प्रमुख आकर्षणे आहेत.

इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (आयएचएम), दादर येथील किचन स्टुडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचे सादरीकरण करण्यात येत आहे. याशिवाय, राज्यातील लोककला आणि सांस्कृतिक परंपरांची ओळख करून देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा –  नाशिकमध्ये ६,२३३ भाविकांची सामूहिक गोदा आरती; सात दिवसांत दोन विश्वविक्रमांची नोंद

गड-किल्ल्यांपासून समुद्रकिनाऱ्यांपर्यंत पर्यटनाची माहिती

महाराष्ट्रातील गड-किल्ले, समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे, निसर्गरम्य पर्यटनस्थळे, साहसी पर्यटन, ग्रामीण पर्यटन आणि सांस्कृतिक परंपरांची माहिती या दालनाच्या माध्यमातून पर्यटकांना दिली जात आहे. पैठणीसारखी पारंपरिक वस्त्रकला, स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तकला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून राज्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख करून देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळण्यासोबतच राज्यातील पर्यटन व्यवसाय, स्थानिक कलाकार, कारागीर आणि खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे.

राष्ट्रीय एकात्मतेसोबत सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना

पर्यटन विभागाचे सचिव संजय यादव म्हणाले, राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने देशातील विविध राज्यांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांची ओळख करून देणे, परस्पर संवाद वाढविणे आणि विविधतेतील एकतेची भावना अधिक दृढ करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक परंपरा, वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती आणि पर्यटन क्षेत्रातील विविध संधी देशभरातील पर्यटकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र पर्यटनाच्या दालनाला भेट देऊन राज्यातील कला, संस्कृती आणि पारंपरिक पैठणी विणकामाची माहिती जाणून घेतल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे म्हणाले, महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर महत्त्वपूर्ण स्थान मिळवून देण्यासाठी राज्यातील पर्यटनवैविध्याची देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी मांडणी करणे आवश्यक आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पर्यटन विभाग विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर राज्याचे पर्यटनवैभव सादर करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

केवडिया (एकतानगर) येथील या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा, निसर्गसौंदर्य, पारंपरिक कला, खाद्यसंस्कृती आणि सांस्कृतिक परंपरा व्यापक स्तरावर पोहोचविण्याची संधी मिळत आहे. पंतप्रधानांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या पर्यटनवैभवाला राष्ट्रीय स्तरावर अधिक प्रसिद्धी मिळण्यास आणि राज्यातील पर्यटनस्थळांकडे देशभरातील पर्यटकांचे लक्ष वेधले जाण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button