TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पान मसाला जाहिरात प्रकरणी अजय देवगणची मुंबई उच्च न्यायालयात धाव; FDAची कारवाई मात्र सुरूच राहणार

अजय देवगणने FDAच्या नोटिशीला दिले आव्हान; शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांनाही नोटीस, विमल इलायचीच्या जाहिरातीतून प्रतिबंधित पान मसाल्याचे अप्रत्यक्ष प्रमोशन होत असल्याचा FDAचा आरोप

मुंबई : पान मसाल्याच्या जाहिरात प्रकरणात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बजावलेल्या नोटिशीला अभिनेता अजय देवगण याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आपल्या याचिकेत अजय देवगणने FDAच्या नियमांच्या घटनात्मक वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जाहिरातीत अभिनेता म्हणून काम केल्यामुळे थेट आपल्याला नोटीस बजावणे चुकीचे असल्याचे त्याचे म्हणणे आहे. या प्रकरणात कारवाईची जबाबदारी अभिनेत्याऐवजी जाहिरात देणाऱ्या आणि उत्पादन करणाऱ्या कंपनीची असायला हवी, अशी भूमिका त्याने याचिकेत मांडली आहे.

अजय देवगणच्या याचिकेत नेमके काय?

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याने महाराष्ट्र FDAकडून मिळालेल्या कारणे दाखवा नोटिशीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. जाहिरातीत काम केल्याबद्दल अभिनेत्याला थेट जबाबदार धरणे योग्य नसल्याचा युक्तिवाद त्याने केला आहे.

अजय देवगणच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी; राहुल गांधींचा भाजपला थेट इशारा, म्हणाले, ‘जनता हे विसरणार नाही’

शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांनाही FDAची नोटीस

महाराष्ट्र FDAने ऑगस्ट २०२६ मध्ये अभिनेता अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना विमल इलायचीच्या जाहिरात प्रकरणात कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. विमल इलायचीच्या नावाखाली प्रत्यक्षात विमल पान मसाल्याचे सरोगेट प्रमोशन केले जात असल्याचा FDAचा आरोप आहे.

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तपास पूर्ण झाल्याचे सांगितले होते. या तपासात तिन्ही अभिनेत्यांनी राज्यातील नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण संयुक्त आयुक्तांकडे पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

FDAचे निर्देश काय आहेत?

महाराष्ट्रात तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पान मसाला आणि गुटख्यावर बंदी आहे. अशा परिस्थितीत इलायचीच्या जाहिरातीचा वापर करून समान ब्रँड नेम, लोगो, सादरीकरण आणि संवाद यांच्या माध्यमातून ग्राहकांमध्ये विमल पान मसाल्याची ओळख निर्माण केली जात असल्याचा FDAचा दावा आहे. त्यामुळे प्रतिबंधित उत्पादनाची अप्रत्यक्ष जाहिरात होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

FDAने तिन्ही अभिनेत्यांना जाहिरातीतील त्यांच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. तसेच एंडोर्समेंट करार, जाहिरातीसाठी घेतलेले मानधन आणि संबंधित माहिती सादर करण्याचे निर्देश दिले होते. ही जाहिरात हटवण्यासह भविष्यात अशा जाहिरातींमध्ये काम न करण्याबाबतही निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

निर्माता कंपनीनेही दिल्ली उच्च न्यायालयात घेतली होती धाव

यापूर्वी विमल उत्पादनाची निर्माता कंपनी पीबी अ‍ॅग्रोने ऑगस्टमध्ये महाराष्ट्र FDAच्या नोटिशीला आव्हान देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने क्षेत्राधिकाराचा मुद्दा उपस्थित करत याचिका फेटाळली होती. महाराष्ट्र FDAच्या कारवाईशी संबंधित प्रकरणाची सुनावणी महाराष्ट्रातील न्यायालयात होणे योग्य असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते.

त्यानंतर आता अजय देवगणने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, त्याच्या याचिकेनंतरही FDAच्या सुरू असलेल्या कारवाईला स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडते, याकडे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button