‘बोध कीर्तन’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ठाकरे बंधूंची फटकेबाजी; राज ठाकरेंनी सांगितले राऊतांच्या पहिल्या मुलाखतीचे किस्से
मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत संजय राऊत लिखित ‘बोध कीर्तन’ पुस्तकाचे प्रकाशन; जुन्या आठवणी, लेखन आणि वाचनावर रंगली चर्चा

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत लिखित ‘बोध कीर्तन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि लेखक अंबरिश मिश्र प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी आपल्या आध्यात्मिक बाजूवर भाष्य करत मिश्कील शैलीत फटकेबाजी केली. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू उलगडताना जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यापूर्वी संजय राऊत यांनी तुरुंगातील अनुभवांवर आधारित ‘नरकातील स्वर्ग’ हे पुस्तक प्रकाशित केले होते. आता ‘बोध कीर्तन’च्या माध्यमातून त्यांच्या लेखनाचा आणखी एक पैलू वाचकांसमोर आला आहे.
राज ठाकरेंनी सांगितले संजय राऊतांच्या जुन्या आठवणींचे किस्से
राज ठाकरे यांनी पुस्तकाचे प्रकाशक मेहता यांच्याशी संबंधित प्रसंग सांगत मराठी भाषेच्या लेखन आणि वापराबाबत भाष्य केले. शासकीय कार्यालयांमधील, विशेषतः न्यायालयांमधील मराठी भाषेचा दर्जा सुधारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. न्यायालयीन नोटिसांमधील भाषा अनेकदा समजण्यास कठीण आणि अवघड असल्याचे ते म्हणाले.
संजय राऊत यांच्याशी आपले संबंध अनेक वर्षांपासून असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळातील आठवणी सांगितल्या. राऊत, दिलीप ठाकूर हे आपल्या वडिलांकडे येऊन बसायचे. संजय राऊत यांचा पहिला संबंध आपल्या वडिलांशी आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आला, असे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे म्हणाले की, १९८० च्या दशकात ते लोकसत्तासाठी व्यंगचित्रे काढत असत. त्यावेळी संजय राऊत गँगवारवरील बातम्यांसाठी प्रसिद्ध होते. १९८८-८९ च्या सुमारास राऊत ‘सामना’मध्ये आले. त्यावेळी दोघांमध्ये चांगली मैत्री होती. राऊत अनेकदा ‘सामना’मधील लिखाणाच्या भाषेबाबत नाराजी व्यक्त करायचे, अशी आठवण त्यांनी सांगितली.
हेही वाचा – दुष्काळी मदतीच्या वाटपात बार्शीची आघाडी; शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा होण्यास सुरुवात
बाळासाहेबांच्या मुलाखतीचा राज ठाकरेंनी उलगडला किस्सा
संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी बाळासाहेबांना विचारून पाहण्याचे आश्वासन दिले. मुलाखत शिवसेना भवनात सुरू झाली. मात्र, मुलाखतीदरम्यान बाळासाहेबांनी राऊत यांना सुनावले. तरीही ती मुलाखत जशीच्या तशी प्रकाशित करण्यात आली. राऊत यांनी मुलाखतीतील प्रसंग न लपवता प्रसिद्ध केल्याचे बाळासाहेबांना आवडले, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
‘बंदे में दम है’ अशी प्रतिक्रिया बाळासाहेबांनी दिल्याची आठवणही राज यांनी सांगितली. पुस्तकातील विविध गोष्टींचा उल्लेख करत त्यांनी संजय राऊत यांनी आणखी पुस्तके लिहावीत; मात्र ती बाहेर राहून लिहावीत, अशी मिश्कील इच्छा व्यक्त केली. ऑर्थर रोड तुरुंगाबाहेर पुस्तकांचा स्टॉल मिळाला तर मेहता पब्लिकेशनलाही फायदा होईल, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
पेन दिसेनासे होतील, आताची मुले मोबाईलवर टायपिंग करतात : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनीही संजय राऊत यांच्या लेखनप्रवासाचा उल्लेख केला. सकाळी चहा पिताना बातम्या पाहत असताना ‘सामना’मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अग्रलेख प्रसिद्ध झाला की काहीतरी घडले असावे, असे वाटायचे. त्यानंतर आपण संजय राऊत यांना फोन करायचो, अशी आठवण त्यांनी सांगितली.
पुस्तकाच्या निमित्ताने लेखनाच्या बदलत्या सवयींवर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काही दिवसांनी अक्षरे आणि पेन संग्रहालयात ठेवण्याची वेळ येईल की काय, असा प्रश्न पडतो. आजच्या मुलांना लिहिण्यापेक्षा मोबाईलवर वेगाने टायपिंग करता येते. पूर्वी ‘बाई वेडा’ हा शब्द चर्चेत होता; आता ‘मोबाईल वेडा’ अशी स्थिती असल्याचा टोला त्यांनी लगावला.
आम्ही वाचतो कमी, वाचवतो जास्त
यावेळी उद्धव ठाकरे यांनी वाचन आणि व्यस्त सार्वजनिक जीवनातील तडजोडीवरही भाष्य केले. अनेकांना आपण खूप वाचन करतो असे वाटते; मात्र प्रत्यक्षात आम्ही वाचतो कमी आणि वाचवतो जास्त, असे ते म्हणाले. अनेक गोष्टी वाचण्याची इच्छा असूनही व्यस्ततेमुळे त्या राहून जातात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
‘बोध कीर्तन’ या पुस्तकाच्या रचनेचाही त्यांनी उल्लेख केला. पुस्तकातील काही पानांवर केवळ चार ओळी असल्या, तरी त्या चार ओळींमध्येही मोठा आशय असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात लेखन, भाषा, वाचन आणि संजय राऊत यांच्याशी असलेल्या जुन्या संबंधांवर रंगलेली चर्चा लक्षवेधी ठरली.




