‘अर्णब’ चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात घेतले चार बळी; हजारो झाडांसह विजेचे खांब उन्मळले

Cyclone Arnab | बंगालच्या उपसागरात घोंगावणारे ‘अर्णब’ चक्रीवादळ बुधवारी पहाटेच्या सुमारास आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले. या वादळामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशा या दोन राज्यांत घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये एकूण चार जणांचा मृत्यू झाला. यानम आणि रायलसीमादरम्यान हे वादळ जमिनीवर दाखल झाल्यानंतर ताशी ३२ ते ९६ किलोमीटर वेगाने वाहणारे वारे आणि २०० मिमीहून अधिक झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्व किनारपट्टीवर मोठे नुकसान झाले आहे.
बुधवारी पहाटे दोन ते सकाळच्या आठ वाजेदरम्यान चक्रीवादळाने किनारपट्टीला तडाखा दिला. वादळी वाऱ्यांमुळे किनारपट्टी भागातील हजारो झाडे उन्मळून रस्त्यांवर पडली असून अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने बत्ती गुल झाली आहे. २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने रस्ते खचले असून वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. सध्या स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा रस्त्यावरील झाडे हटवून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा
तीव्रता घटली, तरी अतिवृष्टीचा इशारा कायम
वादळ जमिनीवर दाखल झाल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली असून, त्याचे रूपांतर अतितीव्र चक्रीवादळातून ‘तीव्र चक्रीवादळा’त झाले आहे. तरीही केंद्र सरकारने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, आंध्र प्रदेशच्या उत्तरेकडील भाग आणि ओडिशा किनारपट्टीवर गुरुवारी पहाटेपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.




