सिंचन प्रकल्पांसाठी निधीचे नियोजन करा; शेतकऱ्यांना दिलासा द्या – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना आणि पेंच उजव्या मुख्य कालव्याचा आढावा; प्रलंबित देयके, पुनर्वसन आणि नागरी सुविधांबाबत अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : सिंचन प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधीचे नियोजन करावे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. नागपूर जिल्ह्यातील सर्व उपसा सिंचन योजना आणि पेंच उजव्या मुख्य कालव्याच्या सद्यःस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
या बैठकीत सिंचन प्रकल्पांची प्रगती, निधीची उपलब्धता, प्रलंबित कामे आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रकल्पांच्या कामांसाठी निधीची कमतरता भासू नये, यासाठी उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतुदींचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार निधीचे पुनर्विनियोजन करण्याबाबतही विचारविनिमय झाला.
प्रलंबित देयके तातडीने निकाली काढण्यावर भर
शेतकऱ्यांची देयके प्रलंबित राहू नयेत आणि सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामांवर परिणाम होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक प्रस्ताव आणि कागदपत्रे तातडीने तयार करावीत, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. निधीच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. तसेच, पूरक अर्थसंकल्पातील तरतुदींच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा – महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबईत विशेष व्यवस्था; अण्णा बनसोडे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी पर्यायी जागांचा शोध
धरणातील पाणीसाठ्याची उंची वाढल्यामुळे पूर्वी निश्चित केलेल्या पुनर्वसनाच्या जागा अपुऱ्या ठरण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पर्यायी जागांचा शोध घेणे, जमीन संपादन करणे आणि नव्याने पुनर्वसन आराखडा तयार करणे, अशा सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.
प्रकल्पबाधित कुटुंबांना भूखंड, रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच, त्यांच्या आर्थिक मदतीच्या मागण्यांचाही नियमानुसार विचार करावा, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
सिंचन प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करणे, निधीअभावी कामे रखडू न देणे आणि प्रकल्पबाधित शेतकरी व कुटुंबांच्या समस्यांचे निराकरण करणे, यावर या बैठकीत भर देण्यात आला.




