Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

व्यसनमुक्त युवकांच्या सामर्थ्यातून विकसित भारताचे स्वप्न साकार करा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

नाशिकमध्ये ‘सशक्त युवा, सशक्त भारत’ अभियान; युवकांना व्यसनमुक्तीची शपथ, शिस्त आणि चांगल्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन

नाशिक : युवकांनी व्यसनांपासून दूर राहून चांगल्या सवयी, शिस्त आणि एकाग्रतेच्या बळावर स्वतःचे चारित्र्य घडवावे. स्वतः व्यसनमुक्त राहण्यासोबतच मित्र, सहाध्यायी, कुटुंबीय आणि समाजातील नागरिकांनाही व्यसनमुक्त जीवनासाठी प्रोत्साहित करावे. युवकांच्या सामर्थ्याचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारत २०४७ साकार करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

मराठा विद्याप्रसारक समाज, नाशिक आणि एस. जे. ए. ॲनालिटिकल लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदास कलामंदिर येथे ‘सशक्त युवा, सशक्त भारत’ अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल वर्मा यांनी उपस्थितांना व्यसनमुक्त राहण्याची शपथ दिली.

कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, न्या. दिलीप घुमरे, न्या. मदन गोसावी, ॲड. महेश सावंत आणि मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

युवकांची शक्ती ही राष्ट्राची अमूल्य संपत्ती

भारत हा जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. देशातील सुमारे ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील असून, ही युवा शक्ती विकसित भारताच्या उभारणीसाठी मोठी संधी आहे. युवकांच्या क्षमतेचा योग्य उपयोग झाल्यास विकसित भारत २०४७ च्या संकल्पनेला भक्कम पाया मिळेल, असे राज्यपाल वर्मा यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी स्पष्ट ध्येय निश्चित करून एकाग्रता, शिस्त आणि सकारात्मक विचारांच्या बळावर यश संपादन करावे. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा संदर्भ देत राष्ट्रनिर्मितीसाठी खंबीर मनोबल आणि ध्येयाप्रती समर्पण आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळविणे नव्हे, तर व्यक्तीचे चारित्र्य घडविण्याची प्रक्रिया आहे. शिक्षणातून विवेक, शिस्त, चांगल्या सवयी आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव विकसित झाली पाहिजे. व्यक्तीच्या सवयींमधून तिचे चारित्र्य घडते आणि चारित्र्य तिच्या भविष्याची दिशा ठरवते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी अंगीकारून व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा –  सिंचन प्रकल्पांसाठी निधीचे नियोजन करा; शेतकऱ्यांना दिलासा द्या – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

व्यसनमुक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवा

अमली पदार्थांचे व्यसन हे युवकांसमोरील गंभीर आव्हान आहे. व्यसनामुळे एकाग्रता कमी होऊन शैक्षणिक आणि वैयक्तिक प्रगतीत अडथळे निर्माण होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनमुक्त राहण्याबरोबरच समाजातही व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे राज्यपालांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांनी घेतलेली व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता आयुष्यभर तिचे पालन करावे. स्वतः व्यसनांपासून दूर राहणे, इतरांना त्यापासून दूर राहण्यासाठी मदत करणे आणि समाजात जागरूकता निर्माण करणे, हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. ‘सशक्त भारतासाठी सशक्त युवा’ ही व्यापक लोकचळवळ उभी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

युवकांनी आजच्या संधींचा योग्य उपयोग करून स्वतःचे भविष्य घडवावे, मित्रांना योग्य दिशा द्यावी आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणावे. राष्ट्रनिर्मिती ही प्रत्येक नागरिकाच्या छोट्या-छोट्या योगदानातून साकार होते. विकसित भारताच्या भक्कम पायामध्ये प्रत्येक युवकाने आपल्या कार्याची एक वीट रचावी, असे आवाहन राज्यपाल वर्मा यांनी केले.

पालकांच्या स्वप्नांचा सन्मान करा – गिरीश महाजन

पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले की, पालक आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठे कष्ट घेत असतात. त्यांच्या स्वप्नांचा आणि त्यागाचा आदर राखून विद्यार्थ्यांनी चुकीच्या संगतीपासून दूर राहावे आणि व्यसनांच्या प्रलोभनांना बळी पडू नये.

अमली पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्याचे गंभीर नुकसान होते. व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम केवळ संबंधित व्यक्तीपुरते मर्यादित राहत नाहीत, तर संपूर्ण कुटुंबालाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मित्रांच्या दबावाखाली न येता व्यसनांना ठामपणे नकार द्यावा आणि आपल्या मित्रांनाही योग्य मार्गदर्शन करावे, असे त्यांनी सांगितले.

भारत हा तरुणांचा देश असून युवक ही राष्ट्राची खरी शक्ती आहे. देशाला विकसित राष्ट्र आणि जागतिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांचे सशक्त, निरोगी, शिस्तबद्ध आणि राष्ट्रप्रेमाने प्रेरित असणे आवश्यक असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार

कार्यक्रमात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू दिलीप गावित आणि सर्वेश कुशारे, ॲड. जयंत जायभावे, माजी आमदार निशिगंधा मोगल, डॉ. हिरालाल पवार, मिलिंद जोशी आणि शिवम यादव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ॲड. महेश सावंत यांनी प्रास्ताविक केले. स्वाती पवार यांनी सूत्रसंचालन केले, तर माजी आमदार जयंत जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button