TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; खेळासाठी मैदाने, सायकल ट्रॅक उभारणार!

महापालिका शाळांमध्ये ‘सुजाण नागरिक, सक्षम भारत’ उपक्रमांतर्गत नागरिक अभ्यासक्रमाचा शुभारंभ; विद्यार्थ्यांना संविधान, अधिकार आणि कर्तव्यांचे महत्त्व पटवून दिले

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्ये, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव करून देण्यासाठी ‘सुजाण नागरिक, सक्षम भारत’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनमूल्यांवर आधारित नागरिक अभ्यासक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच मुंबईतील मुलांसाठी खेळाची मैदाने उपलब्ध करून देण्यासह सायकल ट्रॅक उभारण्याची घोषणाही केली.

विद्यार्थ्यांना दिले संविधानाचे धडे

या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडा वाचून दाखवला. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये समजून घेण्याचे आवाहन करताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाचा आणि विचारांचा उल्लेख केला.

“बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेविरोधात संघर्ष केला. मात्र, मनात कटुता न ठेवता त्यांनी संविधानाची निर्मिती केली,” असे फडणवीस म्हणाले. विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्ये समजून घेऊन ती आपल्या आचरणात आणावीत, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईतील मुलांसाठी मैदाने आणि सायकल ट्रॅक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी खेळाच्या सुविधा वाढवण्याची घोषणा केली. राज्य सरकारच्या माध्यमातून मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच विद्यार्थ्यांसाठी सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सुविधांमुळे मुलांना खेळ आणि शारीरिक विकासासाठी अधिक संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान देणे पुरेसे नसून, त्यांच्यात सामाजिक जाणीव आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा –  ‘सत्ता नसल्याने विरोधकांची तडफड’; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

शिक्षणासोबत नागरिकत्वाची जाणीव आवश्यक

“आपण देशात हुशार पिढी घडवत आहोत. मात्र, विद्यार्थ्यांना अधिकारांसोबत कर्तव्यांची आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव झाली नाही, तर केवळ शिक्षणाच्या जोरावर अपेक्षित प्रगती साधता येणार नाही,” असे फडणवीस यांनी सांगितले.

आजच्या काळात विद्यार्थ्यांना विविध माध्यमांतून जगभरातील माहिती मिळते. या माहितीचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना माहितीपूर्ण आणि सुजाण नागरिक बनवण्यासाठी योग्य मूल्यांचे संस्कार करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संविधानिक मूल्यांतून विकसित भारताचे ध्येय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार करताना जगातील विविध संविधानांचा अभ्यास केला; मात्र भारतीय समाजातील मूल्ये आणि गरजा लक्षात घेऊन संविधानाची रचना केली, असे मुख्यमंत्री म्हणाले. भारतीय संविधानाने भविष्याचा वेध घेतला असून, बदलत्या काळातही त्यातील तत्त्वे आणि मूल्ये महत्त्वाची राहतील, असे त्यांनी नमूद केले.

संविधानाने समानतेची भावना दृढ केली असून, बाबासाहेबांनी दिलेली मूल्ये आत्मसात केल्यास विकसित भारताच्या उभारणीत योगदान देता येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

‘सुजाण नागरिक, सक्षम भारत’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांना संविधान, समानता, सामाजिक संवेदनशीलता आणि नागरिकांच्या जबाबदाऱ्यांची ओळख करून देण्यावर भर देण्यात येत आहे. शिक्षणासोबतच जबाबदार नागरिक घडवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group