प्रभाग १६ मधील पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा १ नोव्हेंबरला आंदोलन!
नगरसेविका ऐश्वर्या तरस यांचा प्रशासनाला इशारा; रावेत पंपिंग स्टेशनवरील वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मधील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा कमी दाबाने, अपुरा आणि अनियमित होत असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन पाणीपुरवठा सुरळीत व नियमित करावा, अन्यथा १ नोव्हेंबर २०२६ रोजी नागरिकांसह आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. यासंदर्भात त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी आणि विद्युत विभागाचे सहशहर अभियंता महेश कावळे यांना लेखी निवेदन देऊन तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.

प्रभाग क्रमांक १६ अंतर्गत विकासनगर, बापदेव नगर, दत्तनगर, किवळे, रावेत, वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा परिसर, साईनगर तसेच मामुर्डी परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी पाणी कमी दाबाने येत असून, काही भागांत अपुरा आणि अनियमित पुरवठा होत असल्याने दैनंदिन गरजांसाठी नागरिकांची गैरसोय होत आहे. पिण्याचे पाणी आणि घरगुती वापरासाठी आवश्यक पाणी मिळवताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हेही वाचा – अप्पूघरमध्ये पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे, महापालिका प्रशासनाकडे कामाची माहितीच नाही..!

वीजपुरवठा खंडित झाल्यास पंपिंगवर परिणाम
रावेत पंपिंग स्टेशन, सर्वे क्रमांक १६ येथे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पाणी उपसा आणि पंपिंग प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी आवश्यक जनरेटरची सुविधा उपलब्ध नसल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे वीजपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास संपूर्ण यंत्रणेवर परिणाम होऊन नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या समस्येवर केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नगरसेविका तरस यांनी स्पष्ट केले आहे.
रावेत पंपिंग स्टेशनवर आवश्यक क्षमतेचा जनरेटर तातडीने खरेदी करून बसविण्यात यावा, तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही पंपिंग प्रक्रिया सुरू राहील आणि नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करता येईल, अशी व्यवस्था निर्माण करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.


प्रशासनाला १ नोव्हेंबरपर्यंतची मुदत
पाणीपुरवठा विभाग आणि विद्युत विभागाने या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन समन्वयाने तातडीने कार्यवाही करावी. जनरेटर खरेदी व बसविण्याची प्रक्रिया पूर्ण करून पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच, संबंधित विभागाने केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. नागरिकांना वारंवार पाणीटंचाईचा सामना करावा लागणे ही गंभीर बाब असून, मूलभूत गरज असलेल्या पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये, याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, अशी भूमिका नगरसेविका तरस यांनी मांडली आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
१ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस कार्यवाही न झाल्यास रावेत पंपिंग स्टेशन येथील पाणीपुरवठा व्यवस्थेतील कथित निष्काळजीपणा विरोधात आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांच्या विरोधात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या उपायुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी प्रशासनाची राहील, प्रभागातील नागरिकांना नियमित, पुरेशा दाबाने आणि सुरक्षितपणे पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिका प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आहे.
– ऐश्वर्या राजेंद्र तरस, नगरसेविका, पिं. चिं. मनपा.




