‘एकदा बाहेर ते कायमचे बाहेर’; सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांना सूचक इशारा
‘दादा खूप मोठ्या मनाचे होते, दादांसारखी मी नाही’; अध्यक्षपदाचा निर्णय निवडणुकीनंतरच, सुनेत्रा पवारांची स्पष्ट भूमिका

बारामती : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. प्रचारासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना राजकीय वातावरण तापले असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नाव न घेता बंडखोरी करून भाजपच्या साथीने पॅनल उभे करणारे पुरुषोत्तम जगताप यांना सूचक इशारा दिला.
‘कुठल्याही चुकीच्या अफवांना बळी पडू नका. एकदा बाहेर ते कायमचे बाहेर, एवढे लक्षात ठेवा. दादा खूप मोठ्या मनाचे होते, दादांसारखी मी नाही,’ असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्याची सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
‘अध्यक्षपद आधीच ठरलेले नाही’
सोमेश्वर कारखान्याच्या अध्यक्षपदाबाबत विविध अफवा पसरत असल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांनी अध्यक्षपदाचा निर्णय निवडणुकीनंतरच घेतला जाईल, असे स्पष्ट केले.
‘चेअरमन सर्वसमावेशक असेल. सर्वांच्या मर्जीनुसारच अध्यक्षाची निवड केली जाईल. कोणीही आधीच ठरवलेले नाही. निवडणूक होऊ द्या, त्यानंतर चेअरमन कोण असेल ते ठरवू,’ असे त्यांनी सांगितले.
तसेच कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐकायला येणाऱ्या विविध राजकीय चर्चांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले. ‘अनेक अफवा ऐकायला येतात. कुठलीही अफवा खरी आहे असे समजू नका,’ असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा – राजपाल यादवंची वडिलोपार्जित मालमत्ता विकून कर्ज फेडण्याची तयारी; चेक बाऊन्स प्रकरणात सुप्रीम कोर्टाची मंजुरी
सोमेश्वर कारखान्यात तिरंगी लढत
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसह बंडखोर गटामुळे लढत रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जय पवार गावोगावी बैठका घेत प्रचार करत आहेत. तर शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पक्षाकडून युगेंद्र पवार यांच्याकडूनही जोरदार प्रचार केला जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीतून बंडखोरी करत पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या साथीने स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. त्यांच्या पॅनलच्या प्रचारासाठी पुरुषोत्तम जगताप यांच्यासह भाजपचे माजी आमदार संजय जगताप सक्रिय आहेत.
घरोघरी गाठीभेटींवर भर
प्रचारासाठी आता केवळ तीन दिवस शिल्लक असल्याने तिन्ही गटांकडून मतदारांच्या गाठीभेटींवर विशेष भर दिला जात आहे. मोठ्या जाहीर सभांपेक्षा गावोगावी बैठका आणि घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधण्यावर उमेदवारांचा भर असल्याचे चित्र आहे.
सोमेश्वर कारखाना निवडणुकीचा प्रचार ९ ऑक्टोबरला संपणार असून, ११ ऑक्टोबरला २१ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात प्रचाराला आणखी वेग आला असून, कोणत्या पॅनलला मतदारांचा कौल मिळणार याकडे बारामती तालुक्याचे लक्ष लागले आहे.




