प्रेमानंद महाराजांच्या भेटीसाठी ५ कोटी घेतल्याचा आरोप खोटा; विराट कोहलीच्या टीमकडून स्पष्टीकरण

Virat Kohli | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने वृंदावन येथील प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू प्रेमानंद गोविंद शरण महाराजांच्या भेटीसाठी ५ कोटी रुपये घेतल्याचा आरोप त्याच्या व्यवस्थापन टीमने ठामपणे फेटाळून लावला आहे. हे आरोप “पूर्णपणे खोटे, निराधार आणि तथ्यहीन” असल्याचे सांगत, अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन कोहलीच्या टीमने अधिकृत निवेदनातून केले आहे.
श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे अध्यक्ष दिनेश फलहारी महाराज यांनी एका व्हिडीओमध्ये दावा केला होता की, वृंदावनमधील एका संताची भेट घडवून आणण्यासाठी एका प्रॉपर्टी सिंडिकेटने तब्बल ५ कोटी रुपये खर्च केले होते. या दाव्यानंतर सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली होती. तथापि, या आरोपांची पुष्टी करणारा कोणताही पुरावा, करार किंवा बँक व्यवहारांची नोंद समोर आलेली नाही.
या वादावर पडदा टाकत विराट कोहलीच्या टीमने निवेदन प्रसिद्ध केले. “दिनेश फलहारी महाराजांनी केलेले सर्व दावे पूर्णपणे निराधार आणि असत्य आहेत. विराट कोहली केवळ मनापासून असलेली श्रद्धा आणि नितांत आदरभावापोटीच प्रेमानंद महाराजांच्या भेटीसाठी जात असतो. प्रसारमाध्यमांनी कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करावी आणि जबाबदारीने वृत्तांकन करावे,” असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा

विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी जानेवारी २०२३ मध्ये पहिल्यांदा प्रेमानंद महाराजांची भेट घेतली होती. त्यानंतर अनेक महत्त्वाच्या दौऱ्यांपूर्वी व मालिकांनंतर हे दाम्पत्य महाराजांच्या आश्रमात दर्शनासाठी जात राहिले आहे.
मैदानावर विराटची ऐतिहासिक कामगिरी
दरम्यान, क्रिकेटच्या मैदानात विराट कोहली सध्या उत्कृष्ट फॉर्मात आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेत त्याने पुनरागमन करत पहिल्याच सामन्यात नाबाद १३९ धावांची शानदार खेळी केली. या खेळीसह कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा जादुई टप्पा पार केला असून, क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनंतर हा विक्रम करणारा तो जगातील केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे.





