MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री; ‘मराठी मुलांच्या नोकरीसाठी कोणाचेही पाय धरायला तयार’
‘तुमच्या रागात सहभागी व्हायला आलोय’; ७० हजारांची मेगा भरती होणार नाही, म्हणत सरकारच्या धोरणांवर राज ठाकरेंचा हल्लाबोल

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. ‘मी तुमच्या रागात सहभागी व्हायला आलोय. तुम्हाला आलेला राग हा तात्पुरता असू नये,’ असे आवाहन करत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
महाराष्ट्रातील मराठी मुला-मुलींच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी कोणाचेही पाय धरावे लागले तरी आपण तयार आहोत, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र, सरकारवर विद्यार्थ्यांचा दबाव वाढला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
मुंबईतील आंदोलनाचा संदर्भ देताना राज ठाकरे म्हणाले की, ‘तुमच्याकडे पेपर फुटतात, आमच्याकडे मतं फुटतात.’ विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील वर्षे स्पर्धा परीक्षा आणि नोकरीच्या प्रतीक्षेत जात आहेत, तर राजकारणातही सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका त्यांनी केली.
अनेक विद्यार्थी कर्ज काढून पुण्यात शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या अपेक्षेने त्यांना पाठवले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध गुंतागुंतीच्या प्रश्नांमध्ये अडकवण्याऐवजी त्यांच्या मूळ प्रश्नांवर सरकारने लक्ष द्यावे, असे राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा – फॉर्म ६’वर सर्वोच्च न्यायालयाचं मोठं विधान; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया
‘७० हजारांची मेगा भरती होणार नाही’
सरकारकडून ७० हजार पदांची मेगा भरती करण्याचे सांगितले जात आहे. मात्र, ही भरती प्रत्यक्षात होईल का, याबाबत राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘कुणाचेही सरकार आले तरी ७० हजारांची भरती होणार नाही,’ असे ते म्हणाले. सरकारी नोकऱ्यांची संख्या कमी होत असताना खासगीकरणाचा वेग वाढत असल्याची टीकाही त्यांनी केली.
विमानतळांसह विविध क्षेत्रांचे खासगीकरण होत असल्याचा आरोप करत सरकारच्या धोरणांवर त्यांनी निशाणा साधला. तरुणांनी केवळ आश्वासनांवर विसंबून न राहता सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
‘सरकारला तुमचे म्हणणे ऐकण्याची भीती निर्माण करा’
निवडणुकीच्या काळात पैसे, जेवण आणि दारूच्या माध्यमातून मतदारांना प्रभावित केले जाते, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली. त्यामुळे योग्य प्रतिनिधी निवडण्याबाबत तरुणांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
‘मी भाषण करायला आलो नाही, मी तुम्हाला भेटायला आलो आहे. तुमचे प्रश्न कुठल्याही मार्गाने सुटले पाहिजेत,’ असे राज ठाकरे म्हणाले. मराठी मुलांच्या नोकरीसाठी आपण कोणाचेही पाय धरायला तयार असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
सरकारची धोरणे चुकत असतील तर त्याविरोधात तरुणांनी आवाज उठवला पाहिजे. ‘सरकारवर तुमचा दबाव वाढला पाहिजे. मी राजकारण करण्यासाठी आलो नाही,’ असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर लवकर तोडगा निघावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.




