तुकाराम मुंढेंचा आता दारू आणि प्रोटीन पावडर विक्रेत्यांवर मोर्चा; भेसळखोरांवर FDAची कडक कारवाई
पनीर, दूध, दहीपासून बड्या कंपन्यांपर्यंत कारवाई; न्युट्रास्युटिकल्सच्या लेबल, घटक आणि दाव्यांचीही होणार तपासणी

मुंबई : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील भेसळखोरांविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. पनीर, दूध, दही यांसारख्या अन्नपदार्थांमधील भेसळीविरोधात कारवाई केल्यानंतर आता न्युट्रास्युटिकल्स अर्थात प्रोटीन पावडर विक्रेते आणि दारूमधील भेसळीवर प्रशासनाचा फोकस राहणार आहे. अन्न आणि औषध क्षेत्रातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कारवाई करण्याची भूमिका FDAने घेतली आहे.
न्युट्रास्युटिकल्सच्या उत्पादनांमध्ये वापरण्यात येणारे घटक, लेबलवरील माहिती, उत्पादनासंदर्भात करण्यात येणारे दावे तसेच विक्रीची पद्धत यांची तपासणी FDAकडून केली जाणार असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रोटीन पावडर आणि विविध आरोग्यविषयक उत्पादनांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमध्येही प्रशासनाच्या तपासणीची चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा – IND vs WI ODI : अंतिम सामन्यातील पराभवानंतर टीम इंडिया-वेस्ट इंडिजला दंड; संथ षटकगतीचा बसला फटका
दारूमधील भेसळीवरही कारवाई
सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित अन्न आणि दर्जेदार उत्पादने मिळणे महत्त्वाचे असल्याचे मुंढे यांनी सांगितले. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ तसेच संबंधित नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज त्यांनी व्यक्त केली.
दारूच्या तपासणीदरम्यान भेसळ आढळल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे आता दारूची निर्मिती, विक्री आणि त्यामध्ये होणाऱ्या भेसळीची तपासणी करण्यावर FDAकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी दारूमधील भेसळीमुळे जीवितहानी झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा विषय अधिक गंभीर झाला आहे.
गणेशोत्सवाच्या काळातही FDAकडून विविध ठिकाणी अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी आणि कारवाई करण्यात आली होती. या कारवाईवरून काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मात्र, नागरिकांना सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्न मिळणे हा प्रशासनाचा प्रमुख उद्देश असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, FDAच्या कारवाईमुळे भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये चिंता निर्माण झाली असून, आता दारू आणि न्युट्रास्युटिकल्स क्षेत्रातील नियमभंगावर प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे लक्ष लागले आहे.





