ताज्या घडामोडीपुणे

एसआयआर : हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; बीएलओ घरी येऊन कागदपत्रे स्वीकारणार

नोटीसधारक मतदारांना दिलासा; मतदार यादीत नाव नोंदणी व दुरुस्तीची पुन्हा संधी

पुणे | भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्यासाठी १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ‘नो मॅपिंग’ किंवा तार्किक विसंगतीमुळे नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे स्वीकारणार आहेत. त्यामुळे पात्र मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्ती तसेच हरकती नोंदविण्याची पुन्हा संधी उपलब्ध झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

मतदार यादीतील नोंदीमध्ये तार्किक विसंगती आढळून नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांनी सुनावणीसाठी तहसील कार्यालय, निवडणूक निर्णय अधिकारी (ईआरओ) किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (एईआरओ) कार्यालयात गर्दी करण्याची आवश्यकता नाही. संबंधित मतदारांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. बीएलओ घरी भेट देऊन कागदपत्रे स्वीकारतील. उपलब्ध सुविधेनुसार व्हॉट्सअॅप किंवा ऑनलाइन माध्यमातूनही आवश्यक कागदपत्रे सादर करता येतील. संबंधित विसंगतीच्या अनुषंगाने प्राप्त कागदपत्रे, बीएलओचा अहवाल किंवा पंचनामा याआधारे प्रकरणाची कार्यवाही करण्यात येईल. कागदपत्रे अपूर्ण असल्यास आवश्यकतेनुसार अपवादात्मक परिस्थितीत ऑनलाइन सुनावणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

३, ४, १० आणि ११ ऑक्टोबरला विशेष शिबिरे

वाढीव कालावधीत कोणताही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये संबंधित बीएलओ उपस्थित राहतील. प्रारूप मतदार यादीत नावाची पडताळणी, नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना ६, मतदार यादीतील तपशीलात दुरुस्तीसाठी नमुना ८ तसेच नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांकडून आवश्यक कागदपत्रे स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

हेही वाचा

अभिनेत्री नुसरत भरुचाचा बालीमध्ये भीषण अपघात; एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईत आणले

ऑनलाइन सुविधेचाही लाभ घ्यावा

प्रारूप मतदार यादीतील आपले नाव शोधणे, नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना ६ भरणे तसेच मतदार यादीतील माहितीमध्ये दुरुस्तीसाठी नमुना ८ ऑनलाइन भरता येणार आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या ‘वोटर हेल्पलाइन’ अॅपचा वापर करता येईल. एसआयआर कार्यक्रम, नोटीस, मतदार नोंदणी तसेच विशेष शिबिरांबाबत अधिक माहितीसाठी १९५० या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.

महाविद्यालयांमध्ये ५ ते ९ ऑक्टोबरदरम्यान नोंदणी

कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये ५ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पात्र विद्यार्थ्यांची ऑनलाइन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच औद्योगिक आस्थापना, कंपन्या, कारखाने आणि विविध संस्थांमधील पात्र नागरिकांची मतदार नोंदणी वाढविण्यासाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मतदार जागृती व विशेष नोंदणी उपक्रम राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील कोणताही पात्र मतदार मतदार यादीतून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांनी घाबरून तहसील कार्यालयात गर्दी न करता संबंधित बीएलओशी संपर्क साधावा. विशेष शिबिरे तसेच ऑनलाइन सुविधांचा लाभ घ्यावा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button