प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात महत्त्वाचा धागा; पप्या शिंदेची कार घटनास्थळाजवळून जप्त
हत्येच्या ठिकाणापासून अवघ्या १० मीटरवर तीन दिवसांपासून उभी होती कार; चौकशीतून पोलिसांना मिळाली माहिती

ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणातील आरोपी पप्या शिंदे याच्याशी संबंधित कार ठाणे गुन्हे शाखेने जप्त केली आहे. ही कार पूर्णेकर यांची हत्या झालेल्या ठिकाणापासून अवघ्या १० मीटर अंतरावर मागील काही दिवसांपासून उभी असल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. कारची चावीही घटनास्थळाजवळ आढळून आली.
पप्या शिंदे याच्या चौकशीतून पोलिसांना कारबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरात शोध घेतला. त्यावेळी ही कार घटनास्थळाच्या अगदी जवळ आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून कार ताब्यात घेतली. तपासात या वाहनाचा नेमका वापर कशासाठी करण्यात आला होता, याचा शोध घेतला जात आहे.
पप्या शिंदे हा पूर्णेकर यांचा परिचित असून, हत्येच्या दिवशी तो घटनास्थळी उपस्थित होता. पोलिसांच्या तपासानुसार तो हत्येच्या कटात सहभागी असल्याचा संशय आहे. त्याला यापूर्वीच अटक करण्यात आली असून, त्याची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, पूर्णेकर हत्या प्रकरणात तपास पथकाने आज आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. निखिल यादव आणि नितेश पवार यांना कर्नाळा अभयारण्य परिसरातून अटक करण्यात आली असून, त्यामुळे अटक केलेल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे. हत्येमागील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक कारणांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
हेही वाचा – मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीला नवे लोकेशन; मानखुर्दमधील १४ एकर शासकीय जमीन चित्रीकरणासाठी उपलब्ध
गणेश नाईकांकडून पूर्णेकर कुटुंबीयांची भेट
दरम्यान, मंत्री गणेश नाईक यांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांनी हत्येप्रकरणी काही गंभीर आरोप करत सखोल तपासाची मागणी केली.
“पूर्णेकर कुठल्या पक्षात होते, यापेक्षा ते एक सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांच्या कुटुंबीयांनी आपली भूमिका मांडली आहे. बरेच आरोपी अटक झाले आहेत. तपासात कोणतीही कसूर ठेवू नये,” अशी भूमिका गणेश नाईक यांनी मांडली.
पूर्णेकर हत्या प्रकरणात शिवसेना (शिंदे गट) नेत्या मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावरही आरोप झाले आहेत. मात्र, मीनाक्षी शिंदे यांनी हे आरोप फेटाळून लावत पोलिस तपासातून सत्य समोर येईल, असे म्हटले आहे.
गुन्हे शाखेकडून पूर्णेकरांच्या कार्यालयाची पाहणी
दरम्यान, ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी आणि त्यांच्या पथकाने प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या झालेल्या कार्यालयाची पाहणी केली. पूर्णेकर कुटुंबीयांचे काही महत्त्वाचे दस्तऐवज या कार्यालयात होते. ते कुटुंबीयांना आवश्यक असल्याने कार्यालय उघडून कागदपत्रांची पाहणी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हत्येच्या तपासासाठी ठाणे पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. सीसीटीव्ही फुटेज, आरोपींच्या हालचाली, वाहनांचा वापर, शस्त्रांचा पुरवठा आणि हत्येमागील संभाव्य सूत्रधार याबाबत तपास सुरू आहे.




