पादचारी पुलावरील इलेक्ट्रॉनिक जाहिरात फलकांची चौकशी; अण्णा बनसोडेंचे विस्तृत अहवालाचे निर्देश
टिचर्स कॉलनीसमोरील पुलावर फलकांमुळे पादचाऱ्यांना अडथळा आणि वाहतूक सुरक्षेचा प्रश्न; परवानगी प्रक्रियेसह सुरक्षेच्या सर्व बाबी तपासण्याचे आदेश

मुंबई : बांद्रा पूर्व येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील टिचर्स कॉलनीसमोरील पादचारी पुलावर उभारण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक जाहिरात फलकांच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून विस्तृत अहवाल प्राधान्याने सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या प्रकरणासंदर्भात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी विधानभवन येथे बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. बैठकीला सहायक अनुज्ञप्ती अधीक्षक नम्रता जवळकर, अनुज्ञापन खात्याचे वरिष्ठ निरीक्षक नागेश साटम, निरीक्षक सुनील कातकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता, तक्रारदार तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पादचाऱ्यांना अडथळा होत असल्याची तक्रार
‘आवाज इंडिया’ टीव्ही चॅनेलला दिलेल्या निवेदनानुसार, बांद्रा पूर्व येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील टिचर्स कॉलनीसमोरील पादचारी पुलावर ‘प्रोॲक्टिव्ह इन अँड आऊट अॅडव्हर्टायझिंग प्रा. लि.’ या कंपनीने डिजिटल इलेक्ट्रॉनिक जाहिरात फलक बसविले आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूंना फलक उभारण्यात आल्याने पादचाऱ्यांच्या ये-जा करण्यासाठी उपलब्ध जागा कमी होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या पुलाचा वापर महिला, लहान मुले आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात करतात. फलकांमुळे पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत असून, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढू शकते, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. पुलावर चोरी तसेच अन्य गैरप्रकारांचा धोका असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
हेही वाचा – दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; खरीप पीक कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन
वाहनचालकांचे लक्ष विचलित होण्याची शक्यता
इलेक्ट्रॉनिक जाहिरात फलकांवर सतत बदलणाऱ्या जाहिराती आणि व्हिडिओ प्रदर्शित केले जात असल्याने वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहनचालकांचे लक्ष विचलित होण्याची शक्यता असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अतिवर्दळीच्या मार्गावर अशा प्रकारच्या डिजिटल जाहिरात फलकामुळे वाहतूक सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो, अशीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच संबंधित कंपनीकडे हे फलक उभारण्यासाठी आवश्यक परवानगी आहे का, याबाबतही तक्रारदाराने प्रश्न उपस्थित केला आहे.
परवानगीपासून सुरक्षेपर्यंत सर्व बाबींची तपासणी
बैठकीदरम्यान अण्णा बनसोडे यांनी फलकांची उभारणी, त्यासाठी झालेली परवानगी प्रक्रिया, पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर होणारा परिणाम आणि वाहतूक सुरक्षेशी संबंधित विविध बाबींचा आढावा घेतला.
पादचारी पुलावर उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांमुळे नागरिकांना होणारा अडथळा, संभाव्य अपघाताचा धोका तसेच वाहनचालकांचे लक्ष विचलित होण्याबाबतच्या तक्रारींचीही त्यांनी दखल घेतली.
सामान्य नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा विषय गंभीर असून, प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी करून वस्तुनिष्ठ आणि विस्तृत अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.





